Pune Crime: पन्नास लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी 'या' माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 01:40 PM2021-12-23T13:40:07+5:302021-12-23T13:40:15+5:30
पोलिसांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशीरा अटक केली
पुणे : पोलिसांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशीरा अटक केली. याप्रकरणी सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे याच्यासह चौघांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोथरूड येथील एका ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीवर २०१८ - २०२० मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयाबाबत फिर्यादी यांनी आल्हाट याच्यासोबत संपर्क केला होता. त्यावेळी आल्हाटने डेक्कन पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द तक्रारी अर्ज करा तुम्हाला त्रास दिल्याचे आठ दिवसात पैसे काढून देतो. माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील अधिकारी यांचेशी ओळखी आहेत मी आतापर्यंत ३२ अधिकारी निलंबित केलेले असल्याचे फिर्यादींना सांगून उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द त्याचे लेटरहेड वर अर्ज करण्यास भाग पाडले. त्यानंतर आल्हाटने फिर्यादींना घरी बोलावून सोनवणे अर्ज प्रकरणात ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. मला पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व पालवे यांचे विरुध्द केलेले अर्ज मागे घेऊन देईल असे म्हणून मी सांगितल्या प्रमाणे वागला नाहीत. तर तुम्हाला पण लटकवुन टाकील, जीवे मारुन टाकील अशी धमकी दिली. तसेच इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर दबाव टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आल्हाट याला अटक केली आहे.