माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला अटक (सुधारित बातमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:33+5:302021-07-01T04:09:33+5:30

(सुधारित बातमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि गेल्या दीड वर्षापासून फरारी असलेला रवींद्र बऱ्हाटे याची ...

RTI activist Ravindra Barhate's wife arrested (Updated News) | माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला अटक (सुधारित बातमी)

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला अटक (सुधारित बातमी)

Next

(सुधारित बातमी)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि गेल्या दीड वर्षापासून फरारी असलेला रवींद्र बऱ्हाटे याची पत्नी संगीता रवींद्र बरहाटे (वय ५५) हिला गुन्हे शाखेने आज कटात सहभागी असल्याच्या कारणावरून अटक केली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी रवींद्र बऱ्हाटे याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ बनविण्यास मदत करणार्या पितांबर धिवार यालाही अटक करण्यात आली आहे.

सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधि तसेच अनु.जाती़ व अनु.जमाती कायद्याखाली हा गुन्हा दाखल केला होता. रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह १३ जणांवर मोक्काअंतर्गत करवाई करण्यात आली आहे. बऱ्हाटे याच्या संपर्कात राहून कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरून ही अटक करण्यात आली आहे. तसेच बऱ्हाटे याला व्हिडिओ बनविण्यास मदत करणार्या व यातील आरोपी सचिन गुलाब धिवार याचा भाऊ पितांबर धिवार यालाही अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी रवींद्र बऱ्हाटे याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने आपण कशा पद्धतीने हे सर्व केले याची माहिती दिली होती. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी धिवार याने मदत केल्याचे समोर आले आहे.

बऱ्हाटे टोळीप्रमुख असून त्याच्यासह एकूण १३ हून अधिक लोकांवर १२ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी हडपसर, कोथरुड, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बऱ्हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बऱ्हाटे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी आहे. त्याचा न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई महसूल विभागाने केली.

बऱ्हाटेचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. बऱ्हाटे याच्याशी त्याची पत्नी संगीता या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना आज दुपारी ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले. तेथे त्यांची अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांनी चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना हडपसर येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली. रवींद्र बरहाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.

Web Title: RTI activist Ravindra Barhate's wife arrested (Updated News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.