शुल्कवाढीविरोधात आरटीओत आंदोलन
By Admin | Published: January 11, 2017 02:43 AM2017-01-11T02:43:37+5:302017-01-11T02:43:37+5:30
पूर्वकल्पना न देता केंद्र सरकारने मोटार वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.
पिंपरी : पूर्वकल्पना न देता केंद्र सरकारने मोटार वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने मंगळवारी दुपारी मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर संघटनेने परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यामध्ये नंदकुमार चव्हाण, संतोष चुंबळकर, कार्याध्यक्ष अकबर शेख, सचिव स्वप्निल पवार, सहसचिव नारायण सव्वासे, खजिनदार सुनील बर्गे, चंद्रशेखर परदेशी, अरुण शहा, प्रकाश मुरकुटे, अकबर शेख, दत्ता मोरे, दिनेश तट्टू, गणेश ढेरे,समीर शेख, अरविंद इंदलकर, झाकीर शेख, संदीप देसाई, अशोक मालवाड सहभागी झाले होते.
आरटीओ कार्यालयांना आणि नागरिकांना शुल्कवाढीबाबतची पूर्वकल्पना मिळणे अपेक्षित होते. मात्र शासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
शिकाऊ वाहन परवाना शुल्क पूर्वी ३१ रुपये होते. सुधारित शुल्करचनेनुसार शिकाऊ परवान्यासाठी आता १५० रुपये मोजावे लागणार आहेत. स्मार्ट कार्ड नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्रासाठी २०० रुपये जादा शुल्क असणार आहे. २९ डिसेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे २९ डिसेंबरपूर्वी वाहन परवान्यासाठी अर्ज केलेल्या ग्राहकांकडून अधिकचे पैसे घेतले जाणार आहेत. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. (प्रतिनिधी)