आरटीओ कार्यालयात सोमवारी शुकशुकाट
By admin | Published: November 15, 2016 03:15 AM2016-11-15T03:15:50+5:302016-11-15T03:15:50+5:30
केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्याचा फटका आरटीओ कार्यालयासह अनेकांना बसला आहे़ आरटीओ कार्यालयाकडून दर दिवशी लाखोंचा
पिंपरी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्याचा फटका आरटीओ कार्यालयासह अनेकांना बसला आहे़ आरटीओ कार्यालयाकडून दर दिवशी लाखोंचा कर शासनाच्या तिजोरीत जमा होत असतो़ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अधिक कर जमा होण्याच्या हेतूने सोमवारी गुरूनानक जयंतीनिमित्त सुटीचा दिवस असूनही आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते़ मात्र, नागरिकांसह एजंटाकडे सुटे पैसे नसल्याने आणि काहीही व्यवहार नसल्याने सोमवारी आरटीओ कार्यालयात शुक शुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले़
एरवी वाहनांच्या नोंदी, पसंतीचे क्रमांक, वाहन परवाना, विविध कागदपत्रांची नावनोंदणी करण्यासाठी नागरिकांची झुंबड आरटीओ कार्यालयात होत असते़ अक्षरक्ष: उभा राहण्यासाठी नागरिकांमध्ये तू-तू, मै-मै झाल्याचे अनेक प्रकार घडले आहे़ मात्र, मंगळवारपासून केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे एजंटासह अनेकांचे धाबे दणाणले आहेत़ आरटीओ कार्यालयातील बहुतांश विभागात रोख आणि आॅनलाइन भरणा केला जातो़ सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस सुटीचा असतानाही नागरिकांकडून पाचशे आणि हजारांच्या नोटा भरण्याच्या अपेक्षेने आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते़ मात्र, किरकोळ भरणा वगळता आरटीओ कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला़ मागील पाच ते सहा दिवसांपासून आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरकांची संख्या तुलनेने खूपच कमी झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी दिली़ (प्रतिनिधी)