आरटीओ सांगते 'नवा दंड घेणार', वाहतूक पोलीस म्हणतात, 'जुनाच लागू होणार', दोघांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:19 AM2021-12-09T11:19:02+5:302021-12-09T11:19:38+5:30
वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यामुळे दंड जुना, भरपाई मात्र नवी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याबाबत आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलीस यांच्यात संभ्रम दिसून येते.
पुणे : मोटार वाहन कायद्यात करण्यात आलेल्या नव्या सुधारणांमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. हे कमी की काय म्हणून नव्या नियमांतर्गत जर वाहनधारकांनी पूर्वीचे दंड भरले नसतील तर त्यांना नव्या दंडाच्या रकमेप्रमाणे दंड भरावा लागणार आहे. हा दंड जुन्या दंडाच्या रक्कमेत दहापट आहे. हे वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यामुळे दंड जुना, भरपाई मात्र नवी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याबाबत आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलीस यांच्यात संभ्रम दिसून येते.
वाहतुकीच्या प्रलंबित गुन्ह्यांवर नव्या नियमांचा विचार केला तर सर्वच गुन्ह्यांवर जवळपास दुप्पट दंड आकाराला गेला आहे. यासंदर्भात राज्याच्या परिवहन विभागाने १ डिसेंबर रोजी आदेश काढले आहेत, मात्र त्यांची अजून अंमलबजावणी सुरू झाली नाही. या आदेशात कोठेच जुन्या दंडाच्या रकमेचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी दंड भराल त्या दिवशी लागू असलेली दंडाची प्रचलित रक्कमच लागू केली जाणार आहे. आदेशाचा विचार करता १ डिसेंबरपासूनच राज्यात मोटार वाहतुकीचे नवे कर लागू झाले आहेत, मात्र वाहतूक पोलिसांना अद्याप यासंदर्भातले आदेश प्राप्त न झाल्याने त्याची अंमलबाजवणी सुरू झाली नाही.
जुने ई-चलानवर नव्या दंडाची मात्रा
लाखो पुणेकरांनी अद्याप विविध गुन्हे अंतर्गत दंडाची रक्कम भरलेली नाही. पुणे पोलिसांनी त्यांना दंडाचे ई-चलान दिले आहे. आता जरी त्यांना जुने दंड दिसत असले तरीही त्यांना नव्या नियमाप्रमाणेच दंड भरावा लागणार आहे. राज्यातील वाहतूक पोलिसांची ई-चलान प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल. तेव्हा नव्या दरानुसारच दंड भरणे अनिवार्य होते.
नवीन दंडच आकारला जाईल
''वाहनावरील दंड जेव्हा भरला जातो तेव्हा अस्तित्वात असलेली दंडाची रक्कम ग्राह्य धरली जाते. जुने दंडच ग्राह्य धरले जावे असा तूर्त तरी सरकारने आदेश दिला नाही. त्यामुळे नवीन दंडच आकारला जाईल असे पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले.''
दंडाची रक्कम जुन्या पद्धतीने वसूल केली जाईल
''नवीन नियमाच्या अंमलबाजवणीचा अद्याप आदेश आलेला नाही. त्यामुळे दंडाची रक्कम जुन्या पद्धतीने वसूल केली जाईल असे पुणे पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी सांगितले.''
असे आहेत नवे दंड
गुन्हा ---पूर्वीचा दंड ----नवीन दंड (रुपये)
विनापरवाना वाहन चालविणे ---५०० ----५ हजार
परवाना रद्द असताना वाहन चालविणे -- १ हजार ---१० हजार
वेगमर्यादांचे उल्लंघन ---१ हजार ---१ हजार
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे --- १ हजार ---१ ते ५ हजार
ट्रिपल सीट ---२०० ---१ हजार
विनाकारण हॉर्न वाजविणे ---५०० ----१ हजार
विनाहेल्मेट वाहन चालविणे ---५०० ---१ हजार