स्मार्टसिटीच्या सीईओपदावरुन रुबल अगरवाल यांना हटविले; घसरलेले मानांकन भोवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 02:37 AM2020-09-09T02:37:44+5:302020-09-09T02:38:19+5:30
गेल्या काही दिवसांत स्मार्ट सिटीच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष पडले महागात
पुणे : ‘स्मार्ट सिटीं’मध्ये मानांकन घसरलेल्या पुणेस्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल यांना हटविण्यात आले असून त्यांचा अतिरीक्त पदभार पुण्यात बदली झालेले उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांच्याकडे देण्यात आला आहे. घसरलेले मानांकन आणि गेल्या काही दिवसात कामाकडे झालेले दुर्लक्ष भोवल्याचे कारण पदभार काढून घेण्यामागे असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील काही प्रशासकीय अधिका-यांच्या राज्य शासनाने मंगळवारी जाहीर केल्या. पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निंबाळकर यांना मात्र नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. कोलते यांच्याकडे स्मार्ट सिटीचा अतिरीक्त पदभारही देण्यात आला आहे.
पालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ जून २०१६ रोजी १४ प्रकल्पांसह स्मार्ट सिटीचे पुण्यात उद्घाटन झाले होते. स्मार्ट सिटी प्रकल्पाची घसरण झाली असून केंद्र शासनाच्या ‘रँकिंग’मध्ये पुणे स्मार्ट सिटी थेट २८ क्रमांकावर गेली होती. निधीच्या विनियोगाचे न केलेले नियोजन आणि नव्या प्रकल्पांचा अभाव यामुळे हे मानांकन घसरल्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर स्मार्ट सिटीकडून माहिती अपडेट केल्यावर १५ स्थान मिळाले. स्मार्ट सिटी प्रकल्पात महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, ठाणे, पिंपरी चिंचवड, कल्याण - डोंबिवली आणि औरंगाबाद आदी शहरांचा समावेश आहे.
स्मार्ट सिटी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. विविध प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांना काळ्या यादी टाकण्यात आले असून काही अधिका-यांच्या नेमणुकांवरुनही वादंग झाला होता. त्यातच निधीचा विनियोग न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत गेल्या पाच वर्षात मिळालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानातून केवळ सुरुवातीच्या तीन वर्षातील ६०० कोटी रुपयांचा विनियोगच केला नाही. ४०० कोटी रुपयेच खर्च झाल्याने पुढील रक्कम मिळण्यावर मर्यादा आल्या. अशा अनेक गोष्टी अगरवाल यांच्याकडून पदभार काढून घेण्यास कारणीभूत ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
====
डॉ. संजय कोलते हे मुळचे जळगावचे असून ते १९९४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी जळगाव, नाशिक, धुळे, मुंबई आणि पुण्यात काम केले आहे.