विमाननगर भागातील ‘एसआरए’ वसाहतीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की, ६० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:01 IST2025-02-19T10:01:13+5:302025-02-19T10:01:35+5:30

दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती मिळताच २ गटांतील वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली

Ruckus in 'SRA' colony in Vimannagar area Police attacked 60 people for crime | विमाननगर भागातील ‘एसआरए’ वसाहतीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की, ६० जणांवर गुन्हा

विमाननगर भागातील ‘एसआरए’ वसाहतीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की, ६० जणांवर गुन्हा

पुणे : विमाननगर भागात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआएए) बांधण्यात आलेल्या वसाहतीत दोन गटांत हाणामारी झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात तीन गुन्हे नोंदविण्यात आले असून, पोलिसांकडून ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत महेश सिकंदर पारधे (वय १८, रा. एसआरए वसाहत, विमाननगर) याने विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारी रोजी महेश आणि त्याचे मित्र इमारतीतील तळमजल्यावर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी काही कारण नसताना पारधे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांना हाॅकीस्टीकने मारहाण केली व दगड फेकून मारला. आरोपींनी वसाहतीच्या आवारात दहशत माजवली, असे पारधेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे करत आहेत.

याच गुन्ह्यात एसआरए वसाहतीतील रहिवासी यासिन नियाजुद्दीन शेख (वय ३८) याने विमानतळ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. शेखने दिलेल्या फिर्यादीनुसार, अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी किरकोळ वादातून शस्त्रे उगारून मारहाण केली. शेख याच्या डोक्यात शस्त्राने वार करून दहशत माजविली. तसेच, घरात शिरून वस्तूंची तोडफोड केली, असे शेख याने परस्पर विरोधी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, एसआरए वसाहतीत दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती मिळताच दोन गटांतील वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन महिलांसह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस हवालदार नीलम मोहरे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.

Web Title: Ruckus in 'SRA' colony in Vimannagar area Police attacked 60 people for crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.