विधी शाखेच्या ‘लॉ ऑफ क्राइम’ची परीक्षा पुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:19 AM2019-02-21T01:19:34+5:302019-02-21T01:19:52+5:30
विद्यापीठावर नामुष्की : विद्यापीठानेच अधिकृतपणे फोडली प्रश्नपत्रिका
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी शाखेच्या प्रथम वर्षातील पहिल्या सत्राचा ‘लॉ ऑफ क्राइम’ या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी हा प्रकार विद्यापीठाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर अखेर त्या विषयाची परीक्षा पुन्हा घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा विभागाचा सावळा गोंधळ गेल्या दीड वर्षापासून सातत्याने सुरू आहे. यापार्श्वभुमीवर परीक्षेपूर्वीच ‘लॉ आॅफ क्राइम’ या विषयाची प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड करण्याचा प्रकार घडला आहे. विद्यापीठाने अखेर याप्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याकडून खुलासा मागविला आहे. या प्रकराला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार असून त्यानुसार संबंधितांविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले आहे.
‘लॉ आॅफ क्राइम’ या विषयाची परीक्षा १५ व १६ फेब्रुवारी रोजी पार पडली. मात्र परीक्षेपूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील ही प्रश्नपत्रिका पाहिली होती. त्यामुळे विद्यापीठानेच प्रश्नपत्रिका अधिकृतपणे प्रश्नपत्रिका फोडल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. त्यानुसार या विषयाची परीक्षा पुन्हा घेणे, याप्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणे, यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत.
परीक्षेची तारीख व वेळ नंतर जाहीर करणार
चौकशी समितीच्या अहवालानुसार विधी प्रथम वर्षाच्या लॉ आॅफ क्राइम या प्रथम सत्रातील विषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणर आहे. याबाबत परीक्षेची तारीख, वेळ याबाबत विद्यार्थ्यांना व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना योग्य वेळी सूचना देण्यात येतील असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या परीक्षा होण्यापूर्वीच त्या विषयाची प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या चुकीचा मोठा फटका विधी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना पुन्हा आणखी एक पेपरच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या या गैरकारभारावर विधी विभागाच्या विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.