MPSC च्या परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ३३ टक्के गुणांचा नियम लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 07:39 PM2022-05-18T19:39:10+5:302022-05-18T19:47:37+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नोटीफिकेशन
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन पेपर १ (२०० गुण) आणि सामान्य अध्ययन पेपर २ (२०० गुण) या दोन पेपरपैकी सामान्य अध्ययन पेपर २ हा अर्हताकारी नियम लागू (क्वालिफाय) केला आहे. मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करण्यासाठी आयोगाने या पेपर २ मध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक केले आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर १ मधील गुणांच्या आधारे आता मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी यापुढे जाहीर करण्यात येणार आहे. यूपीएससीच्या धर्तीवर फायदा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ मधील निर्णय निर्धारण व समस्येचे निराकारण (डिसिझन मेकिंग ॲण्ड प्रोब्लेम स्वॅल्विंग) चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरीता नकारात्मक गुणदान लागू राहणार आहे. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा तसेच एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे लिहिल्यास २५ टक्के गुण वजा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही, असे आयोगाने बुधवारी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा मराठी आणि इंग्रजी या माध्यमातून देता येणार आहे. परीक्षेची पद्धत वैकल्पिक (ऑब्जेक्टिव्ह) आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम (एकूण गुण ४००)
पेपर - १ (२०० गुण)
१) राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी.
२) भारतीय इतिहास (महाराष्ट्रच्या संदर्भात) आणि राष्ट्रीय चळवळ.
३) महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल.
४) महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन.
५) आर्थिक व सामाजिक विकास.
६) पर्यावरण परिस्थिती.
७) सामान्य विज्ञान.
पेपर - २ (२०० गुण)
१) आकलन क्षमता.
२) वैयक्तिक कौशल्य संवाद कौशल्यासह.
३) तार्किक व विश्लेषण क्षमता.
४) निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण.
५) सामान्य बौद्धीक क्षमता.
६) मूलभूत संख्याशास्त्र.
७) मराठी व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये (दहावी/बारावी)