विरोधकांच्या राजकीय जाळ्यात सापडले सत्ताधारी

By admin | Published: June 29, 2017 03:43 AM2017-06-29T03:43:46+5:302017-06-29T03:43:46+5:30

विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा

Rulers found in the political net of opposition | विरोधकांच्या राजकीय जाळ्यात सापडले सत्ताधारी

विरोधकांच्या राजकीय जाळ्यात सापडले सत्ताधारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा म्हणून टिकास्त्र सोडले व त्यात सत्ताधारी अगदी अलगद सापडले. त्यामुळेच सहज सुटू शकणारा विषय त्यांच्यासाठी आता जटील झाला असून तो सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे महापालिकेत बोलले जात आहे.
पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ऐन शाळा सुरू व्हायच्या वेळेस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचे दर प्रतिकिलोमीटर ६१ रुपयांवरून १४१ रुपये केले. त्याची पूर्वकल्पना शाळांना, संचालक मंडळाला दिलीच नाही. एकूण ६७ बस या प्रकारे सुरू होत्या. त्यातील ११ शाळांच्या १७ बस वगळता अन्य शाळांनी वाढीव दराने बस घेतल्या. काही शाळा महापालिकेच्या होत्या, त्या विनामूल्यच असल्याने त्याही सुरूच राहिल्या. प्रश्न फक्त ११ शाळांच्या १७ बसचाच शिल्लक राहिला आहे, असे पीएमपीमधील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यातही पीएमपीएलच्या वतीने सर्वच शालेय विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के सवलतीच्या दरात पास दिला जातो. हे ७५ टक्के महापालिका पीएमपीला देत असते. तरीही काही खासगी शाळांनी आमचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे आम्हाला खास बस हवी, अशी मागणी केली होती. ती महापालिकेने मान्य केली. एका बसमध्ये किमान ४५ विद्यार्थी असतील तर ती बस पीएमपीएलला परवडते, मात्र गेल्या वर्षभरात एका बसमध्ये फक्त २० ते २५ किंवा फारतर २८ विद्यार्थीच येऊ लागले. त्यामुळे ती बस पीएमपीला परवडेनाशी झाली. त्यातूनच मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय घेतला, असे अधिकारी सांगतात. दरम्यानच्या काळात डिझेल व सुटे भाग महागल्यामुळे प्रतिकिलोमीटर दरही ६१ रुपयांहून ८१ रुपये करण्यात आला होता व त्याप्रमाणेच आकारणी सुरू होती. आता पुन्हा तोटा वाढू लागल्यानंतर मुंढे यांनी ही दरवाढ केली. सर्वच शालेय विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत दिली जात असताना व ते पैसे महापालिका अदा करत असताना पुन्हा खास बस कशासाठी या विचाराने त्यांनी नव्याने झालेल्या या दरवाढीबाबत काही शाळांनी दरवाढीबाबत ओरडा सुरू केल्यानंतर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी म्हणून दरवाढीचा विषय लावून धरला, त्यामुळे भाजपाला यावर हालचाल करणे भाग पडले व ते त्यातून ते अडचणीत आले आहेत, असेच दिसते आहे.

Web Title: Rulers found in the political net of opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.