पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; श्रींचे दर्शन ऑनलाईन, गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार, नारळ, मिठाईच्या दुकानांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:44 PM2021-08-31T14:44:23+5:302021-08-31T14:51:16+5:30
सार्वजनिक मंडळांची संवाद साधल्यानंतर शहर पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात करण्यात आली आहे
पुणे : सार्वजनिक मंडळांची संवाद साधल्यानंतर शहर पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात करण्यात आली आहे. मूर्ती खरेदी नागरिकांनी शक्य तो ऑनलाईन खरेदी करावी. मूर्तीच्या स्टॉलजवळ गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी गणेश आगमन श्री आगमन व विसर्जन मिरवणुक काढण्यात येऊ नये. श्री आगमन व विसर्जनच्या विधीसाठी कमीम कमी लोक एकत्र जमतील. गणेश प्रतिष्ठापना सार्वजनिक गणेश मंडळांची मंदिरे आहेत. त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी. अन्यन्य साधारण परिस्थितीत मनपाचे नियम व अटींचे पालन करुन मंडळास छोटे मंडपाकरीता परवानगी दिली जाईल. असे नियम लागू करण्यात आले आहेत.
गणेश पूजा व दर्शन
श्री च्या आरती व पुजेकरीता जास्तीत जास्त ५ व्यक्तीच हजर राहतील. बाहेरील व्यक्तींना त्यात सहभागी करुन घेऊ नये. गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक द्वारे उपलब्ध करुन देण्याचा मंडळांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कोणाही निमंत्रितांना अगर व्हीआयपींना दर्शनाला परवानगी अगर निमंत्रित करण्यात येऊ नये. पंढरपूर वारीच्या वेळी जसे भाविकांनी घरातूनच दर्शन घेतले. तसे श्री गणेशाचे घरातूनच ऑनलाईन दर्शन घ्यावे.
गणेशोत्सवात दुकांनाना परवानगी नाही
गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने लावण्यास मनाई आहे.
उत्सव कालावधीत रस्ता, पदपथांवर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही.
मंडळांनी शिबिरांना प्राधान्य द्यावे
महत्वाच्या गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्याचे रेकॉडिंग करावे. मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे. संपूर्ण उत्सवाचे काळात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम,शिबीरे यांचे आयोजनास प्राधान्य द्यावे. गर्दी जमेल असे कोणतेही उपक्रम करु नये. आरोग्य विषयक मदत, विद्यार्थी वृद्ध,गरजूंना मदत तसेच आरोग्य विषयक प्रबोधनपर ऑनलाईन उपक्रम अनेक मंडळे करु इच्छितात ते स्वागतार्ह आहे. परंतु स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यास योग्य त्या नियमात बसवून घरोघरी मदत पोहोचवून असे उपक्रम करण्याचे प्रयत्न करावेत. कोणीही त्यास समारंभाचे स्वरुप देऊ नये.
सुरक्षा
श्री च्या मूर्तीचे संरक्षणाकरीता तसेच मौल्यवान दागिने असणाऱ्या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. मंडळाचे कमीत कमी ५ कार्यकर्त अथवा खासगी सुरक्षा व्यवस्था २४ तास हजर राहतील, याची दक्षता घ्यावी.
गणेश विसर्जन
श्रींच्या विसर्जनासाठी मिरवणुक काढता येणार नाही. गणेश मूर्ती विसर्जनाकरीता मंडळाने मंडपाचे शेजारी कृत्रिम हौदाची निर्मिती करुन त्यात गणेश मुर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनाच्या वेळी गर्दी न करता कमीत कमी लोक हजर राहतील, याची दक्षता घ्यावी. घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन नागरिकांनी घरीच अथवा सोसायटीमध्ये बनविलेल्या कृत्रिम हौदात करावे.
ध्वनी वर्धक नियम
ध्वनी वर्धक नियम १४ सप्टेंबर (पाचवा दिवस), १६ सप्टेंबर (सातवा दिवस), १८ सप्टेंबर (नववा दिवस) व १९ सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. इतर दिवशी ध्वनीक्षेपकाचा वापर रात्री १० वाजेपर्यंतच करावा.