पोलीसच मोडतात नियम
By Admin | Published: July 6, 2017 03:03 AM2017-07-06T03:03:10+5:302017-07-06T03:03:10+5:30
एखादा वाहनचालक नियम थोडाही नियम चुकला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. मात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
रहाटणी : एखादा वाहनचालक नियम थोडाही नियम चुकला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. मात्र वाहतूक पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे.
सध्या रहाटणी फाटा,शिवार चौक,काळेवाडी फाटा, तापकीर चौक या परिसरात सांगवी वाहतूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे . शिवार चौकात तर मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. त्या वेळी एक अधिकारी, चार पोलीस कर्मचारी व दोन वाहतूक वॉर्डन या वेळी कारवाईत सहभागी झाले होते.
मात्र शिवार चौकातून साई चौकाकडे जाणाऱ्या धावत्या वाहनांना वाहतूक पोलीस व वॉर्डन अडवीत होते. यात एखादा चालक अपघातग्रस्त झाला, तर जबाबदार कोण, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
काळेवाडी फाट्यावर तर पोलिसांकडून सर्रास वाहने अडविली जातात. याला कोणत्याही वाहनचालकाचा आक्षेप नाही. मात्र या ना त्या कारणाने वाहन अडवून दंड आकारण्याला वाहनचालकांचा विरोध आहे. एखाद्या वाहनचालकाने झेब्रा क्रॉसिंग केले, तर त्याला दंड आकारला जातो. मात्र, वाहतूक पोलिसाने झेब्रा क्रॉसिंग केले, तर त्याला दंड कोण करणार? कुंपणच शेत खात असेल, तर त्याला काय म्हणायचे, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
वॉर्डनच करतात ई-चलन
सध्या ई चलनप्रणाली वाहतूक पोलिसांनी अवलंबली असल्याने रोख व्यवहारावर बंधने आली आहेत. या यंत्रणेत वाहनाचा क्रमांक टाकला की, संबंधित चालकाने किती वेळा नियमाचे उल्लंघन केले व किती वेळा त्याला दंड झाला हे दिसून येते. ही यंत्रणा वाहतूक पोलिसांनीच हाताळावी लागते. मात्र, सांगवी वाहतूक विभागात अनेक वेळा वॉर्डनच ई-चलन करताना दिसतात. तसेच वाहन अडविणे, परवाना तपासणे, पेपर तपासणे ही कामे वॉर्डनच करीत आहेत. त्यामुळे हे वॉर्डन वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत, की पावत्या करण्यासाठी, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
पोलिसांकडूनच होतेय
नियमांची पायमल्ली
शहर परिसरात अनेक ठिकाणी पोलिसांकडूनच नियमांचे उल्लंघन होत आहे. येथील अनेक चौकांत वाहतूक पोलीस आणि खाकी वर्दीतील पोलीस बिनधास्तपणे ट्रिपलसिट गाड्या चालवित असतात. तसेच हेल्मेटही वापरत नाहीत. नियम मोडल्यास पावती फाडण्यास कधी न चुकणारे पोलीस नियम कधी पाळणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हाही प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.