खाजगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांची ऐशीतैशी; ना मास्क, ना सॅनिटायझर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:12+5:302021-05-19T04:10:12+5:30
प्रवाशांकडे ना कोरोना चाचणीचा रिपोर्ट ना प्रवासासाठी ई-पास, ५० टक्क्यांपेक्षाही जास्त उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खासगी ट्रॅव्हल्स ...
प्रवाशांकडे ना कोरोना चाचणीचा रिपोर्ट ना प्रवासासाठी ई-पास, ५० टक्क्यांपेक्षाही जास्त उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी ट्रॅव्हल्स सेवा पुण्याहून राज्यातील विविध शहरांसाठी सुरू आहे. पण ही सेवा कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहे. ना प्रवाशांकडून नियमांचे पालन होत आहे, ना ट्रॅव्हल्स सेवा देणाऱ्या कंपनीकडून. काही प्रवासी मास्क लावतात, तर काही लावत नाहीत. काही गाडीत सॅनिटायझरची सोयही नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास तसेच कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना या बाबी तपासल्या जात नाहीत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर कडक निर्बंध आणले. मात्र याची अंमलबजावणी ट्रॅव्हल्स चालकांकडून होत नाही. पुण्याहून मुंबई, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आदी शहरांसाठी वाहतूक सुरू आहे. सध्या केवळ अत्यावश्यक कारणासाठीच एसटीची मर्यादित वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीऐवजी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडत आहेत. या बदल्यात एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत जवळपास दोनशे ते तीनशे रुपये जास्त दिले जात आहेत.
----------------
५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी :
ट्रॅव्हल्सची आसनक्षमता ४५ इतकी आहे. शासनाच्या नियमानुसार गाडीत २२ प्रवासी म्हणजेच ५० टक्केपेक्षा जास्त असता कामा नये. मात्र काही मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये २२ पेक्षा जास्त प्रवासी घेतात. गाडी पुण्यातून बाहेर पडल्यानंतर मार्गावरील छोट्या थांब्यावरच्या प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जातो. अशा टप्पा वाहतुकीसाठी केवळ एसटीलाच परवानगी आहे.
----------------
ना ऑक्सिजन, ना शरीराचे तापमान तपासतात
प्रवासी गाडीत चढत असताना त्याची ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान तपासले गेले पाहिजे. मात्र अशी कोणतीच व्यवस्था गाडीत दिसून आली नाही. तसेच अनेक प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हते. गाडीचे चालक अन्य कर्मचारी देखील विनामास्कच होते. त्यामुळेच मास्क बाबतीत प्रवाशांना सूचना देण्याचा प्रश्नच उरत नाही.
----------------------
ई-पास नाही
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पोलीस आयुक्तालय अथवा ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा पास असणे अनिवार्य आहे. मात्र ट्रॅव्हल्सचे प्रवासी ई-पास न घेताच प्रवास करीत आहेत. चेकपोस्टवर गाडी थांबल्यावर पोलिसाकडून कोणतीही कागदपत्रे पाहिली जात नाहीत.
-----------------
आरटीओची सोयीने कारवाई :
परिवहन आयुक्त यांचा आदेश आल्यावर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे आरटीओची ४४ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई झाली. नंतर मात्र कोणतेही कारवाई झाली नाही. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना विचारले असता ट्रॅव्हल्सची वाहतूक सुरू आहे का? असा प्रतिप्रश्न सुरू उपस्थित करून याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले.
शहरात रोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स येतात आणि जातात. यातून १००० ते १५०० प्रवाशांची वाहतूक होत आहे.