पूर्व हवेलीत होणाऱ्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:11+5:302021-01-17T04:10:11+5:30
ग्रामीण भागात सुरुवातीला ही बाब नागरिकांनी, तसेच प्रशासनाने गांभीर्याने घेतली. परंतु, आता या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. पूर्व ...
ग्रामीण भागात सुरुवातीला ही बाब नागरिकांनी, तसेच प्रशासनाने गांभीर्याने घेतली. परंतु, आता या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. पूर्व हवेलीत होणाऱ्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती,,लोणी काळभोर,,उरुळी कांचन अशा ठिकाणी सर्वत्र लग्नसराई जोरात सुरू असून प्रशासनाची परवानगी काढून विवाह सोहळे पार पडत आहेत. लग्न समारंभात वधू आणि वर पक्षाकडून ५० नागरिकांच्या उपस्थितीबाबत काही नियम प्रशासनाकडून दिलेले आहेत. परंतु सध्या होणाऱ्या लग्नसराईमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. याठिकाणी होणारे हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्यांत हरताळ फासला जात आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी परवानगीच्या क्षमतेहून अधिक संख्येने नागरिक एकत्र येत आहेत. हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वऱ्हाड्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. लॉक डाऊनपूर्वी जशी लग्नात गर्दी असायची तेच चित्र पुन्हा पूर्व हवेलीत दिसू लागले आहे. कदमवाकवस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसराईत कार्यालयाबाहेर लावलेल्या अस्ताव्यस्त गाड्यांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कारवाई मात्र काही झाली नाही. काही लग्नात तर वाजंत्रीच दहा ते पंधरा जण असतात. मग ५० जणांचा नियम कसा राबविला जाईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.