पारंपरिक वाद्यांच्या नियमांची स्पष्टता व्हावी
By Admin | Published: July 5, 2017 02:31 AM2017-07-05T02:31:40+5:302017-07-05T02:31:40+5:30
गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साहाचे प्रतीक. आनंद साजरा करताना रणवाद्य वाजविण्याची एक प्रथा आहे. ढोलांच्या आवाजाच्या
गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साहाचे प्रतीक. आनंद साजरा करताना रणवाद्य वाजविण्याची एक प्रथा आहे. ढोलांच्या आवाजाच्या पातळीची पॅरामीटर्स आम्हाला कळत नाहीत. पोलिसांनी पारंपरिक वाद्यांबाबतची भूमिका स्पष्ट करून नियम स्पष्ट करावेत, अशी भूमिका मांडत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही उत्साहाच्या भरात तारतम्य सोडता कामा नये. उत्सवात मोठमोठ्या स्पीकरच्या भिंती, अश्लील नृत्य अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. यामुळे गणेशोत्सव नाहक बदनाम होत आहे, असे स्पष्ट मत कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम असते. गणेशोत्सवात चेंगराचेंगरीच्या घटना फारशा घटना घडत नाहीत याचे श्रेय त्यांनाच जाते. गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साहाचे प्रतीक. पारंपरिक वाद्यांशिवाय उत्सव साजराच होऊ शकत नाही. आपण तबला, मृदंग किंवा ढोलकी रस्त्याने वाजवत नेऊ शकत नाही. ढोल आणि नगारे वादनाचीच परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. आनंद साजरा करायचा तर रणवाद्ये वाजली गेली पाहिजेत, अशी एक मानसिकता आहे. मात्र ध्वनिप्रदूषणाच्या नावाखाली या वाजण्यावरच निर्बंध आणले जात आहेत. गणेश मंडळांना ढोलांच्या आवाजाची डेसिबलमधील पातळी लक्षात येत नाही. वाद्यांच्या नियमांची स्पष्टता करून मंडळांना ते समजावून सांगण्याची गरज आहे. पारंपरिक वाद्यांमागची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे.
मुळात गणेशोत्सव हा १२५ वर्षांपासून चालत आलेला लोकोत्सव आहे. देश पारतंत्र्यात असतानाही गणेशोत्सवावर निर्बंध आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. ब्रिटिशांनी गणेशोत्सव मिरवणुकीत काठ्या आणायला बंदी घातली, तेव्हा कार्यकर्ते लोकमान्य टिळकांकडे गेले आणि ध्वज आता कशावर लावायचा, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. टिळक खूप हुशार आणि धोरणी होते. टिळकांनी सकाळी ४ वाजता कार्यकर्त्यांना मंडईमध्ये पाठविले आणि ऊस विकत घेण्याचा सल्ला दिला, ऊस खरेदी करून तो ध्वज त्यांनी उसाच्या काठीवर अडकवला. मिरवणुकीत पोलीस जेव्हा आडकाठी करायला आले तेव्हा नोटिशीमध्ये उसाचा कुठेही उल्लेख नाही असे टिळकांनी सुनावले. कायदा आहे; पण त्याचा वापर कसा करायचा? हे टिळकांनी शिकविले. उत्सवात ध्वनिप्रदूषण करता कामा नये हे मान्यच आहे; पण इतर वेळी ध्वनिप्रदूषण होत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जगाच्या नकाशावर पुण्याचा गणेशोत्सव पोहोचला असल्याने गणेश मंडळांची जबाबदारी वाढली आहे. आज ३0 ते ३५ हजार युवक-युवती या उत्सवाशी जोडले गेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवातील कार्यक्रमात देशभक्तिपर गाणी सादर व्हायची, स्वातंत्र्यानंतर कार्यक्रमांची जागा करमणुकीने घेतली. वीज आल्यानंतर गणेशोत्सव हा दृश्य करमणुकीवर भर देणारा ठरला. मग पौराणिक देखाव्यांचा टे्रंड आला, उत्सवावर दहा वाजताची बंधने आल्याने तो डिजिटल झाला असला तरी कसबा गणपती सार्वजनिक गणोशोत्सव हा पारंपरिकच राहिला आहे. प्लेक्स बॅनर संस्कृती कधी आम्ही उत्सवात आणू दिली नाही. व्यक्तीपेक्षा संस्थेलाच आम्ही जास्त महत्त्व दिले. परंपरेचे जतन करण्याबरोबरच संवर्धन करण्यावर आम्ही कायमच भर देत आलो आहोत. मंडळ अनेक विधायक उपक्रम राबवीत आहे. मंडळाने गावही दत्तक घेतले आहे. संस्कृती आहे, पण पैसे नाहीत तरीही आम्हाला याची खंत वाटत नाही. मंडळाने एक अनाथाश्रम उभारण्याचे कामही हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळातही समाजाच्या गरजांचाच विचार मंडळाकडून केला जाणार आहे. उत्सवात कितीही बदल झाले तरी सामाजिक भान नेहमीच मंडळाने राखले आहे. गणपती हा गणांचा अधिपती मानला जातो. उत्सवाला गालबोट लागेल असे कोणतेच काम करता कामा नये. उत्सवात गणपतीसमोर अश्लील नृत्य करणे, स्पीकरच्या भिंती लावणे अशा गोष्टींमुळे उत्सव नाहक बदनाम होत आहे, याचे तारतम्य कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे. पोलिसांनाही मंडळांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलावी लागू नयेत यासाठी वाईट गोष्टी
कशा टाळायला हव्यात याचा विचारही करावा.