सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापूरच्या लोकप्रतिनिधींपुढे झुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:59+5:302021-05-28T04:09:59+5:30

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरुन मंजुर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा मागील आठ दिवसांपासून प्रलंबित असलेला ...

The ruling Nationalist Congress bowed before the people's representatives of Solapur | सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापूरच्या लोकप्रतिनिधींपुढे झुकली

सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापूरच्या लोकप्रतिनिधींपुढे झुकली

Next

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरुन मंजुर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा मागील आठ दिवसांपासून प्रलंबित असलेला आदेशच अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरच्या लोकप्रतिनिधींसमोर झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या निर्णयाने सोलापुरचेच पालकमंत्री व इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या दत्तात्रेय भरणे यांची मोठी कोंडी झाली आहे. अवर्षणप्रवण भागाची या निर्णयामुळे उपेक्षा झाली आहे.

जलसंपदा विभागाने गुरुवारी कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी हा आदेश दिला आहे. त्यानुसार उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून नवीन मुठा उजवा कालव्यात सोडण्याबाबतचा शासनाचा २२ एप्रिल २०२१ रोजी व समकक्ष असणारे आदेशच रद्द केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आमदार संजय शिंदे यांनी यासाठी मोठी ताकद लावली होती. भिमा नदीवरील उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्याचा मोठा त्याग आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरुन राजकारण तापत होते. त्यामुळे मागील ३० वर्षांपासून धगधगणाऱ्या खडकवासला कालव्यावरील ३६ गावांचा व निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न उजनीवरील उपसा सिंचनला मंजुरी मिळाल्यामुळे सुटणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी या योजनेला कडाडून विरोध करत आदेश रद्द करण्यास भाग पाडले. याचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत. खडकवासला कालव्यावरील सुमारे २० हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबून आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते.

इंदापूर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबून आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही अवस्था उन्हाळ्यात गंभीर आहे. नवीन उपसा सिंचनामुळे शेटफळगढे पासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावामधील क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार होते. तसेच खडकवासला कालव्यावरुन सणसर जोड कालव्यामधून २२ गावांना पाणी देण्यासाठी अनेक संघर्ष झाला. अनेक वेळा आंदोलने झाली. मात्र अंथुर्णे पासुन पुढे २२ गावांना बारमाही पाणी मिळविण्यासाठी गेली ३० वर्षे लढा चालू होता. खडकवासला धरणसाखळीत पाणी कमी राहत असल्याने सणसर जोड बोगद्यालाही पाणी दिले जात नव्हते. आता या गावांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.

Web Title: The ruling Nationalist Congress bowed before the people's representatives of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.