निधी नसल्याने सत्ताधारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:47+5:302021-09-22T04:13:47+5:30

अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीवरून स्थायी समिती व आयुक्तांचे सुरू आहे कोल्ड वाॅर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वित्तीय समिती बरखास्त करून ...

The ruling party is helpless due to lack of funds | निधी नसल्याने सत्ताधारी हतबल

निधी नसल्याने सत्ताधारी हतबल

Next

अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीवरून स्थायी समिती व आयुक्तांचे सुरू आहे कोल्ड वाॅर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वित्तीय समिती बरखास्त करून महापालिका अंदाजपत्रकाची शंभर टक्के अंमलबजावणी करा व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य सभेत विरोधकांनी फिल्मी गाण्याचे मुखडे गाऊन विनंती केली. स्थायी समिती आणि आयुक्तांमध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉर वरून सत्ताधाऱ्यांनी थेट आंदोलनाचा इशारा देत निधी नसल्याने रखडलेल्या कामांची यादीच सर्वसाधारण सभेत वाचून दाखवत हतबलता व्यक्त केली.

अंदाजपत्रकाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यावरून स्थायी समिती आणि आयुक्तांमध्ये वाद सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामे झाली पाहिजेत यासाठी स्थायी समिती आग्रही आहे. तर उत्पन्न, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन खर्चाचे नियोजन करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. यामुळे तीन आठवड्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी आयुक्तांचा निषेध करत सभा तहकूब केली. त्यामुळे आयुक्तांनीही पुढील दोन्ही स्थायी समितीकडे पाठ फिरवली.

दरम्यान मंगळवार (दि.२१) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी आयुक्तांना ‘हा रुसवा सोडा आयुक्त बजेट उपलब्ध करून घ्या ना’ हे पद्य स्वरूपात गाऊन आयुक्तांना बजेट वापरण्यास परवानगी देण्याची विनंती केली. तर काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी ‘ छोडो कल की बाते, कल की बात पुरानी ’ असा मुखडा गात आयुक्तांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांनी प्रभागातील मूलभूत कामे रखडलीत आयुक्तांनी बजेट न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. हरिदास चरवड यांनी कामे होत नसल्याने रस्त्यावर फिरता येत नाही. आदित्य माळवे यांनी यावेळी त्यांच्या प्रभागातील रखडलेल्या छोट्या कामांची यादी वाचून दाखवली. आरती कोंढरे यांनी पालिकेचे उत्पन्न चांगले असताना अशा पद्धतीने कामे अडवणे हा जनमताचा अपमान आहे, लोकप्रतिनिधींना न्याय द्यावा अशी मागणी केली. मंजूषा नागपुरे, विशाल धनवडे, राजाभाऊ लायगुडे , सिद्धार्थ धेंडे, गणेश ढोरे, सुभाष जगताप, वसंत मोरे आदींची यावेळी भाषणे झाली.

--------

अनावश्यक पैशांचा अपव्यय टाळा

काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांनी आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन करताना रंगरंगोटी, पिशव्या खरेदी, नामफलक, बेंचेस एकाच कामाची टेंडर तीन तीन वेळा काढले जातात. जेथे कामाची गरज आहे तेथे खर्च केला जावा परंतु अनावश्यक पैशाचा अपव्यय टाळावा अशी सूचना केली.

-------

एकत्रित बसून मार्ग काढावा

लोकप्रतिनिधी व प्रशासन हातात हात घालून काम करत आले आहे. कुठलीही गोष्ट दोन्ही बाजूने ताणली जाऊ नये. यातून सुवर्णमध्य काढावा. गुरुवारी पक्षनेते, आयुक्त व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित बसून मार्ग काढावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केले.

--------

Web Title: The ruling party is helpless due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.