सत्ताधाऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांचीच गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:03 AM2018-10-20T01:03:23+5:302018-10-20T01:03:35+5:30
सभा तहकुबीचा ठराव : कामे होत नसल्याचा रोष उफाळला
पुणे : प्रशासनाकडून कामे होत नसल्याच्या निषेधार्थ शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सत्ताधारी असूनही आक्रमक भूमिका घेत थेट सभा तहकुबीची सूचना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी होत असलेल्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर ही तहकुबी अडचणीत आणेल, हे लक्षात येताच पदाधिकाºयांनी त्यांना तहकुबीची सूचना मागे घेणे भाग पाडले. यावर प्रशासनाकडून कामे करून घेण्यात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी अपयशी होत असल्याची टीका विरोधकांनी लगेचच केली.
कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मेंगडे यांचा प्रभाग येतो. या क्षेत्रीय कार्यालयात ३०० विकासकामे प्रलंबित आहेत. फक्त १० कामांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत व एकच काम पूर्ण झाले आहे. प्रशासनाला कामे करायची आहेत की नाहीत, असा त्रस्त सवाल करीत मेंगडे यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ आपण सभा तहकूबीची सूचना देत असल्याचे सांगितले व तशी सूचना दिलीही. त्यानंतर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व अन्य सत्ताधाºयांची चांगलीच धावपळ उडाली. दीपक पोटे व अन्य काही सदस्य मेंगडे यांच्या बाजूचे होते, तर वर्षा तापकीर, मानसी देशपांडे व अन्य काही सदस्य तहकुबी मागे घ्यावी, या मताचे होते.
सभेचे कामकाज बंद पडून त्यांच्यातच चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे अरविंद शिंदे शांतपणे बसून होते. फक्त कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर सर्वच ठिकाणी अशीच अवस्था असल्याची ठिणगी मात्र त्यांनी यात टाकून दिली. भाजपातच दोन गट पडल्याचे चित्र सभागृहात तयार झाले. मेंगडे यांची सूचना मागे घेण्याची मुळीच तयारी नव्हती, तर भिमाले यांच्यासह सर्वच सदस्य त्यांनी सूचना मागे घ्यावी म्हणून आग्रह धरत होते. महापौर मुक्ता टिळक यांच्या सांगण्यावरून आयुक्तांनी खुलासा केला, की कामांच्या निविदा निघाव्यात, कार्यारंभ आदेश दिले जावेत, यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाला कामच करायचे नाही, ते आचारसंहितेची वाट पाहत आहे, अशी टीका सत्ताधाºयांनीच केली. शिवसेनेचे संजय भोसले यांनी सत्ताधाºयांवर टीका केली. तुपे यांनी सभेत काय सुरू आहे, अशी विचारणा केली.