शहरातील एटीएममध्ये पुन्हा खडखडाट

By Admin | Published: April 11, 2017 03:57 AM2017-04-11T03:57:25+5:302017-04-11T03:57:25+5:30

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने; तसेच पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने देशभरातील एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला होता़ लोकांच्या बँक खात्यात पैसे

Rumble again in the city's ATM | शहरातील एटीएममध्ये पुन्हा खडखडाट

शहरातील एटीएममध्ये पुन्हा खडखडाट

googlenewsNext

पुणे : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने; तसेच पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने देशभरातील एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला होता़ लोकांच्या बँक खात्यात पैसे असूनही त्यांना पैसे मिळू शकत नव्हते़ काहीशी अशीच परिस्थिती सध्या एटीएमबाबत शहरात दिसून येत आहे़ शहरातील बहुसंख्य खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला असून, असंख्य ठिकाणी नो कॅशचे बोर्ड लागले आहेत़ त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़
शहरातील मध्यवस्ती, महत्त्वाचे रस्ते, उपनगरांमधील बहुतेक एटीएममध्ये पैसे नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे नागरिकांची एका एटीएमपासून दुसऱ्या एटीएमकडे धावाधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे़ ज्या ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे दिसून येत आहे़ शहरातील मध्यवस्तीबरोबरच उपनगरांमधील बहुसंख्य एटीएमवर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले दिसत आहेत़ ज्या काही मोजक्या ठिकाणी पैसे आहेत, त्या ठिकाणी केवळ २ हजार रुपयांच्या नोटाच उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे़
कर्वे रोडवरील कर्वेपुतळा ते खंडोजी बाबा चौक दरम्यान किमान विविध बँकांचे १५हून अधिक एटीएम आहेत़ त्यापैकी केवळ नळस्टॉप येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे होते़
त्यातही केवळ २ हजार रुपयांच्या नोटा होत्या़ पौड फाटा, कर्वे रोडवरील पेट्रोल पंपाजवळील एटीएममध्ये तर सुरक्षारक्षकही दिसून आले नाही़
खासगी बँकांच्या जवळपास सर्व एटीएममध्ये ‘नो कॅश’चे बोर्ड लावलेले दिसून आले़ अनेक एटीएममध्ये लाइटही दिसून आली नाही, तर काही एटीएमचे शटरही बंद करून ठेवलेली आढळून आली़
शहरातील मध्यवस्तीतील नारायण पेठ, टिळक रोड या भागातील केवळ एक एटीएम सुरू असल्याचे दिसून आले़ जंगलीमहाराज रोड, कर्वेरोडवरील किमान वीसहून अधिक एटीएममध्ये पैसेच नसल्याचे दिसून आले़ याशिवाय हडपसर, गोखलेनगर, वारजे, मार्केटयार्ड परिसरातील एटीएम बंद असल्याचे दिसून आले़ अनेक ठिकाणी एटीएममध्ये लाइटही नाही़ काही ठिकाणी मशीन चालू असल्याचे दिसते़ पण, कार्ड टाकल्यानंतर ट्रॅन्झॅक्शन करायला सुरुवात केल्यानंतर, सर्वांत शेवटी मेसेज येतो की, नो कॅश.. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातोच, त्याचबरोबर मनस्तापही होत आहे़
नागरिकांनी डिजिटल व्यवहार करावेत, यासाठी जाणीवपूर्वक एटीएममध्ये पैसे भरले जात नसल्याचे बोलले जात आहे़ एटीएम; तसेच बँकांमधून किती वेळा पैसे काढायचे, यावर निर्बंध आणून त्यापुढे पैसे काढल्यास चार्ज लागू करण्यात आला आहे़ त्याचबरोबर पेट्रोलपंपावर कार्डद्वारे पेट्रोल भरल्यास चार्ज पडत आहे़ त्याबरोबर अनेक दुकानदारांनी आता कार्डद्वारे पेमेंट केल्यास, त्यावर २ टक्के चार्ज घेतला जाऊ लागला आहे़ त्यामुळे अनेकांनी आता कार्डद्वारे पेमेंट करणे बंद केले आहे़
(प्रतिनिधी)

निर्बंध हटल्याने पैसे काढण्याचे प्रमाण वाढले
एकावेळी एटीएममधून अधिक रक्कम काढली जाऊ लागली आहे़ त्याचवेळी अनेक एटीएममध्ये नवीन नोटा भराव्या लागत असल्याने व बँकांकडून एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपन्यांकडे पैसे पुरविले नसल्याचे सांगितले जात आहे़

खासगी बँकांचा ताण सहकारी बँकेवर
रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमधून खासगी, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना सारख्याच प्रमाणात नोटा मिळत आहेत़ नोटांचा तुटवडा नाही़ लोकांनी डिजिटल व्यवहाराकडे वळावे, यासाठी खासगी बँकांनी आपल्या एटीएममधील नोटा भरणा करण्याचे प्रमाण कमी केल्याने त्यांची एटीएम रिकामी झाली आहेत़ त्याचा ताण सरकारी बँका व त्यानंतर सहकारी बँकांच्या एटीएमवर आला आहे़ एटीएममधून किती पैसे काढायचे, यावरील निर्बंध दूर केल्याने; तसेच व्यवहारावर चार्जेस लावण्यात आल्याने नागरिक जरुरीपेक्षा अधिक पैसे काढत असल्यानेही हा एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला असावा़
विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को़ आॅप बँक फेडरेशन

Web Title: Rumble again in the city's ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.