भीमा नदीपात्रात खडखडाट!
By admin | Published: March 30, 2017 12:26 AM2017-03-30T00:26:43+5:302017-03-30T00:26:43+5:30
चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी
दावडी: चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी ठणठणीत पडली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच हा प्रश्न उद्भवला असून शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्यानेचासकमान धरणातून थोडे तरी पाणीसोडावे,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातून भीमानदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच मार्च महिन्यात नदी कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग तसेच तरकारी पिके घेतली आहेत. उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. मात्र या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे रोज या बंधाऱ्यांतून लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे नदीपात्रात अडविलेल्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, त्यामुळे कृषिपंप मोकळे पडले आहेत. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडी, पिंपळ, मलघेवाडी, शिरोली येथील शेतकऱ्यांनी
केली आहे.
चासकमान धरणात सध्या36.81% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून एक ४० दिवसांचे डाव्या कालव्याला पाणीवाटप बैठकीत ठरल्यामुळे पाण्याचे आवर्तन बाकी आहे. मात्र पाणी कालव्याला कधी सोडणार, हे अद्याप निश्चित नाही.
रब्बी पिकासाठी साडलेले पाण्याचे आवर्तन खेड व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज नसतानाही दोन महिने डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे दरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. तेच पाण्याचे आवर्तन २५ दिवसांचे केले असते तर धरणात अजून जादा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहून उन्हाळ्याचे दोन महिने या पाण्याचा उपयोग झाला असता. मात्र पाण्याचे वाटप नियोजन योग्य नाही, असे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शिरोली, मांजरेवाडी, पिंपळ, होलेवाडी या परिसरातील शेतकरी पाणी नसल्यामुळे अडचणीत, तसेच दावडी, निमगाव, खरपुडी, टाकळकरवाडी, जऊळके, मांडवळा या परिसरातील कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके धोक्यात.