बॉम्बच्या अफवेने लोहगाव विमानतळावर गोंधळ; काश्मिरच्या तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 05:33 PM2022-01-15T17:33:21+5:302022-01-15T17:58:32+5:30
हा तरुण हा मुळचा काश्मीरचा राहणारा आहे...
पुणे : लोहगाव विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना एका मुळच्या काश्मीरच्या तरुणाने ‘‘माझी बॅग वारंवार का चेक करीत आहेत, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे,’’ असे म्हटल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी विनाकारण अफवा पसरवल्याबद्दल या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समिरन विजय अंबुले (वय २०, रा. धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका २१ वर्षाच्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार लोहगाव विमानतळावरील गो फस्ट एरोचे ब्रिज सेकंडरी लायडर पॉईट चेक येथे १३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हा तरुण हा मुळचा काश्मीरचा राहणारा आहे. सध्या तो भुगावात असून तो विधी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो गो एअरने दिल्लीला जाणार होता. त्यासाठी तो १३ जानेवारी रोजी विमानतळावर आला होता.
यावेळी त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गो फस्ट एरोचे ब्रिज सेकंडरी लायडर पॉईटवर बॅगेची तपासणी करण्यात येऊ लागली. असे ३ ते ४ वेळा त्याची बॅग तपासण्यात आली. तेव्हा तो रागाने काऊंटरवरील तरुणीला ‘‘माझी बॅग वारंवार का चेक करीत आहे, माझ्या बॅगेत काय बॉम्ब आहे?,’’ असे प्रश्नात्मक विचारले असता, हा प्रकार त्या तरुणीला अपमानास्पद वाटल्याने तिने तेथील कर्मचार्यांनी सर्वांना अलर्ट केले.
या तरुणाकडे पुन्हा तपासणी केली. त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही. त्यानंतर या तरुणाला जाऊ देण्यात आले. मात्र, विमानांना व प्रवाशांना धोका नसता बॅगेत बॉम्ब आहे, असे बोलून गोंधळ करुन विनाकारण अफवा पसरवली, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.