चलनातून १० रुपयाचे नाणे बाद झाल्याची अफवा
By Admin | Published: May 26, 2017 05:43 AM2017-05-26T05:43:26+5:302017-05-26T05:43:26+5:30
१० रुपयाचे नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा भिगवण बाजारपेठेत पसरली आहे. घाबरून गेलेल्या शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी मोठ्या प्रमाणावर साठविलेली नाणी बाजारात येत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : १० रुपयाचे नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा भिगवण बाजारपेठेत पसरली आहे. घाबरून गेलेल्या शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी मोठ्या प्रमाणावर साठविलेली नाणी बाजारात येत आहेत. तर मोजण्याचा त्रास आणि साठविण्यासाठी लागणारी जागा यामुळे व्यापारी वर्ग ही नाणी स्वीकारत नसल्याचे बाजारात फेरफटका मारताना आढळून येत आहे.
भारत सरकारने काळ्याबाजाराचे प्रमाण कमी होण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यामुळे संसार खर्चातून बाजूला ठेवलेल्या नोटा महिलावर्गाने बाहेर काढीत बदली नोटासाठी धडपड केली होती. आज तीच वेळ महिलांवर पाहावयास मिळत आहे. काहीतरी शिल्लक मागे पडावी यासाठी महिलावर्गाने १०च्या नाण्याला मोठी पसंती देत डबा अथवा पाकिटात १० रुपयांची नाणी जमा करण्यास सुरवात केली होती. त्यातच अचानक १० रुपयाची नाणी बंद होणार या अफवेने जोर धरला. त्यामुळे महिलांनी ही नाणी बाजारपेठेत आणत खरेदी करण्यास सुरवात केली आहे. भिगवण परिसरातील हॉटेल व्यावसायिक तसेच किराणा दुकानदार ही नाणी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवित असल्याने वादाचे प्रसंग उभे राहत आहेत.
तर परिसरातील बँका ही नाणी स्वीकारताना दिसून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांची यातून सुटका करणे गरजेचे आहे.
या बाबत भिगवण परिसरातील बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आपणाकडे सुट्टी नाणी ठेवण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे ठराविक रकमेपर्यंतच नाणी स्वीकारली असल्याचे सांगितले.