कुजबुज - डॉक्टरांच्या संपत्तीवरुन आला अफवेचा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:57+5:302021-08-01T04:11:57+5:30
लोणावळ्यातील एका बालरोगतज्ञाकडे हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची अफवा इतकी वेगाने पसरली की, मध्यप्रदेशातील टोळीने तेथून लोणावळ्यात येऊन दरोडा ...
लोणावळ्यातील एका बालरोगतज्ञाकडे हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची अफवा इतकी वेगाने पसरली की, मध्यप्रदेशातील टोळीने तेथून लोणावळ्यात येऊन दरोडा टाकला. या दरोडेखोरांना डाॅक्टरांकडे ५० लाख रुपयांची रोकड मिळाली. पण ही रोकडही त्यांना या अफवेमध्ये केल्या जाणार्या दाव्याच्या मानानो खूपच कमी होती. विशेष म्हणजे मावळ तालुक्यात ही अफवा इतकी जोरात फिरत होती की, चक्क पोलिसांनी त्याची खात्री करुन घ्यावीशी वाटली होती. दरोडा पडल्यानंतर तरी ही अफवा थांबेल असे पोलिसांना वाटले होते. पण अफवा ही अशी असते की काही लोकांच्या मनात घर करुन बसते. कितीही सांगितले तरी त्यांना ती खरीच वाटते. पोलीस या दरोड्याचा तपास करीत असताना अचानक एक दिवस एक गृहस्थ पोलिसांकडे आले. त्यांनी डॉक्टर व त्यांच्या संपत्तीविषयीची माहिती दिली. पोलिसांनी त्या गृहस्थाला त्यांच्यावर बंगल्यावर दरोडा पडल्याचे आणि दरोडेखोरांनी ५० लाख रुपये लुटून नेल्याचे सांगितले. मात्र, या गृहस्थाचे त्याने समाधान झाले नाही. तो छातीठोकपणे सांगू लागला की, डॉक्टरांकडे आणखी खूप पैसे साठवून ठेवले आहेत. दरोडेखोरांना ते सापडले नाही, तुम्ही शोध घ्या. त्यांच्या या वक्तव्यावर पोलिसांना कपाळावर हात मारुन घेण्याची पाळी आली.