मुलांना पळवून आणल्याची अफवा, शिक्रापुरात भंगार व्यावसायिकाला नागरिकांकडून चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 03:07 PM2024-05-09T15:07:07+5:302024-05-09T15:07:31+5:30
शिक्रापूर तळेगाव रस्त्यालगत नागरिकांनी संशयित अपहरण करणाऱ्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण केली...
शिक्रापूर (पुणे) : येथील एका भंगार व्यावसायिकाने दौंड तालुक्यातील पाठेठाण परिसरातून दोन मुलांना पळवून आणल्याची अफवा पसरली. नागरिकांनी भंगार व्यावसायिकाची गाडी फोडून त्याला बेदम मारहाण केली. पण मुलांना पळवून आणल्याची अफवा असल्याचे कळताच मारहाण करणाऱ्या नागरिकांनी येथून हळूहळू पळ काढला.
शिक्रापूर तळेगाव रस्त्यालगत नागरिकांनी संशयित अपहरण करणाऱ्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण केली. तसेच त्यांची गाडीदेखील फोडली. दरम्यान, त्यांना तळेगाव ग्रामपंचायतीसमोर नेले. लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात गोळा झाला. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस हवालदार किशोर तेलंग, विकास पाटील, पोलिस नाईक अमोल नलगे, रोहिदास पारखे, प्रफुल्ल सुतार, नारायण सानप, अंकुश चौधरी, तळेगाव ढमढेरेचे पोलिस पाटील पांडुरंग नरके यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत जमावावर आवर घातला. दरम्यान, यवत पोलिस ठाण्याचे पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी चौकशी केली असता ते भांडी व भंगार व्यावसायिकाने पाठेठाण येथून महिलेकडून काही भंगार घेतले. त्याच्याकडे पूर्ण पैसे नसल्याने त्याने मी मुलांकडे पैसे देतो. माझ्यासोबत पाठवता का असे म्हटल्याने मुलांना पाठवले होते. दरम्यान, पाठेठाणमध्ये मुले पळवून नेल्याबाबतची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. दरम्यान, शिक्रापूर येथून पैसे घेऊन मुलांना सोडायला जात असताना पाठेठाण येथून आलेल्या युवकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली.
दरम्यान, केलेल्या मारहाणीबाबत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.