पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 23:33 IST2024-01-01T23:23:58+5:302024-01-01T23:33:04+5:30
टँकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत

पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण
मुंबई - केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याविरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे, राज्यातील अनेक जिल्ह्यात टँकर व ट्रक एकाच जागी बसून होत्या. या घटनेचे पडसाद पेट्रोलपंप चालकांवर होत आहेत. त्यातच, राज्यभरात उद्या पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सर्वत्र पसरली. मात्र, पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचं पेट्रोल-डिझेल असोसिएशसने स्पष्ट केले आहे.
टँकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत. तर, काही ठिकाणी पेट्रोलच्या टँकरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे, उद्या २ जानेवारी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा सर्वत्र पसरली. त्यात अफवेतून राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरायला गर्दी केली. तर, पेट्रोल दर कमी होणार असल्याच्या अफवेनेही काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी झाली. मात्र, पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रेसनोट काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याची संघटनेची कुठलीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशननं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकात म्हटलं की, सर्वसामान्य जनतेला आमची विनंती आहे की, कुठल्याही अफवांमुळं किंवा बातम्यांमुळं पॅनिक होऊ नका. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघठना बांधिल आहे, असं पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी स्पष्ट केलं.
असोसिएशनचं स्पष्टीकरण
पेट्रोल चालकांच्या संपामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन नागरिकांनी दुपारपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुण्यासह सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, लोणी काळभोर येथील केंद्रातून पेट्रोलचे टँकर बाहेर पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. कोठेही पेट्रोलची टंचाई नाही. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, अकारण जादा पेट्रोल भरुन घेऊ नये.