Pune International Marathon 2024: ३८व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज; सणस मैदानापासून सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:01 AM2024-11-27T11:01:31+5:302024-11-27T11:02:12+5:30
४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन त्यानंतर २१, १० आणि ३ किलोमीटरची व्हीलचेअर अशा क्रमाने शर्यत सोडण्यात येणार
पुणे: पुणेआंतरराष्ट्रीयमॅरेथॉन ट्रस्टकडून घेण्यात येणारी यंदाची ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीयमॅरेथॉन रविवारी १ डिसेंबरला पहाटे तीन वाजता सणस मैदान येथून सुरू होणार आहे.
४२.१९५ किमीची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पहाटे ३ वाजता सणस मैदानावरून सुरू होईल, त्यानंतर पहाटे ३:३० वाजता अर्ध मॅरेथॉन २१.०९७५ किमी, सकाळी ६:३० वाजता १० किमी तसेच ७ वाजता ५ किमीची शर्यत (पुरुष आणि महिला गट) आणि सकाळी ७:१५ वा. ३ किमीची व्हीलचेअर अशा क्रमाने शर्यत सोडण्यात येईल. स्पर्धेला सणस मैदानात आतील ट्रॅकवरून सुरुवात होईल. सारसबागमार्गे महालक्ष्मी चौक उजवीकडे वळून सरळ दांडेकर पूल चौकमार्गे सिंहगड रस्ता, गणेश मळा, विठ्ठलवाडी, आनंद हॉल, नांदेड सिटी चौक, उजवीकडे वळून नांदेड सिटीमध्ये आत २ किमी जाऊन (१०.५ किमी अंतर) परत याचमार्गे सणस मैदानावर एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी घेतील. इतर स्पर्धा याच मार्गावर आयोजित केल्या जातील, त्यांचे टर्निंग पॉईंटस वेगळे असून तेथून धावपटू परत सणस मैदानात येऊन स्पर्धा समाप्त करतील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची सुरक्षा, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वैद्यकीय व्यवस्था, राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखालील समितीत १५० डॉक्टर आणि २५० नर्सिंग, फिजीओ स्टाफ, रुग्णवाहिका, १५ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल अशी व्यवस्था केली आहे. सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी, प्रत्येक २.५ किमीवर फिडिंग बूथ, एनर्जी ड्रिंक, फळे अशी सुविधा देण्यात आली आहे. स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण मार्गावर सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था करण्यात येईल. या स्पर्धेत सर्व गटात मिळून संपूर्ण देशातील ८ ते १० हजार खेळाडू सहभागी होतील. संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी ही माहिती दिली.