अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ

By admin | Published: July 21, 2015 03:53 AM2015-07-21T03:53:51+5:302015-07-21T03:53:51+5:30

जिल्ह्यातील जवळपास ७०४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच तालुक्यांत उमेदवारी

Running of candidates to file an application | अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ

अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ

Next

पुणे : जिल्ह्यातील जवळपास ७०४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच तालुक्यांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. अनेक ठिकाणी अर्ज दाखल करण्यास वेळ वाढवून देण्यात आली होती, तर काही ग्रामपंचयातींमध्ये काही उमेदवारांनी डमी अर्जही भरून ठेवले आहेत. जिल्ह्यात कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी रॅली, वाजत-गाजत मिरवणुकीतून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
---------------------------------------------------------
४९ ग्रामपंचायतींसाठी २२६७ अर्ज दाखल
दौंड : दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २२६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजअखेर १४१४ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कचेरीला यात्रेचे स्वरूप आले होते. तहसील कचेरीच्या परिसरात वाहने पार्किंगसाठी मोठी जागा असूनदेखील ती अपुरी पडली. तेव्हा उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात मिळेल त्या जाग्यावर वाहने पार्क केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळ दुपारी ४ वाजेपर्यंत होती.
एकंदरीतच, उमेदवारांची गर्दी आणि परिस्थिती पाहता, दीड तासाची
वेळ वाढवून दिल्यामुळे सायंकाळी साडेपाचपर्यंत आॅनलॉईन
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बऱ्याच उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असल्याने कागदपत्रे पूर्ण करून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे.
एकेका उमेदवारांनी तीन-तीन, चार-चार अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या वाढली आहे.
(वार्ताहर)
-----------------------------------------------------
ओतूरमध्ये ३ पॅनल, अपक्ष रिंगणात
ओतूर : येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ४ आॅगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी आज उमेदवारांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले.
ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ पॅनेल व अपक्ष उमेदवार यांच्यात लढती होणार आहेत. तरीदेखील खरे चित्र २३ रोजी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पुणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, श्री गजाननमहाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे, श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, माजी पंचायत समिती सदस्य रामदास तांबे, जय बजरंग पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष तांबे, माजी पं. स. सदस्य किसन केदार या प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवनेर पॅनल रिंगणात आहे.
ओतूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ६ वॉर्ड असून, एकूण १७ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मोनिका चौकातून या पॅनलच्या समर्थक व उमेदवारांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे २ हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते.
ही रॅली बाजारपेठ, पानसरे आळी, पांढरी मारुती मंदिर, जुने बस स्टँड व नंतर नवीन बस स्टँडवरून परत मोनिका चौकात गेली. रॅलीत फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा यांचा गजर करत उमेदवारांना निवडून देण्याचे आशीर्वादाचे आवाहन केले जात होते. मोनिका चौकातून सर्व उमेदवार जुन्नरकडे अर्ज सादर करण्यासाठी एकत्रितपणे मिरवणुकीने गेले. या निवडणुकीसाठी प्रचारप्रमुख म्हणून वैभव तांबे, संतोष तांबे, रामदास तांबे, किसन केदार हे काम करत असल्याची माहिती पॅनलप्रमुख संभाजी तांबे व अनिल तांबे
यांनी दिली. (वार्ताहर)
-----------------------------------------------------
खरोशी, वाजवणे ग्रामपंचायती बिनविरोध
राजगुरुनगर : शेवटच्या दिवशी विक्रमी ११२३ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार माणिकराजे निंबाळकर यांनी दिली.
खरोशी आणि वाजवणे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे आज दाखल झालेल्या अर्जांवरून स्पष्ट झाले. खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज भरण्यासाठी आज शेवटच्या दिवशी येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलावर उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार हे गृहीत होते. त्याप्रमाणे गर्दी झाली; पण प्रशासन सावध असल्याने काही गडबड गोंधळ झाले नाहीत. शिवाय शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्याने उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरून तयार ठेवले होते. खेड तालुक्यात एकूण ८२ ग्रामापंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट रोजी होत आहेत. तसेच २१ गावांच्या २६ प्रभागांमध्ये पोटनिवडणुका होत असून त्यांचेही अर्ज भरले जात आहेत. निवडणुकांचे उमेदवारी अर्ज राजगुरुनगरला हुतात्मा राजगुरू क्रीडासंकुलात स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारातील नेटवर्क फ्री राहिल्याने आॅनलाइन अर्ज भरताना इतर तालुक्यांप्रमाणे अडचणी आल्या नाहीत.
----------------------------------------------------------
७० ग्रामपंचायती; १३३९ अर्ज दाखल
भोर : भोर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २०११ अर्जांची विक्री झाली, तर १३३९ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. १८ व १९ जुलैला सुट्टी होती आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी व समर्थकांनी उमेदवारी अर्ज जमा करण्यासाठी दिवसभर रांगा लावल्या होत्या. अबालवृद्धांसह महिला व तरुणांचा समावेश होता.
भोर तालुक्यातील १५५ पैकी ७० ग्रामपंचायतींच्या ५०८ जागा, तर पोटनिवडणूक लागलेल्या ४८ ग्रामपंचायतींच्या ८८ अशा एकूण ५९६ जागांसाठी १३३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची दिवसभर विविध कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू होती. त्यामुळे शिक्षक भवन परिसरात सायंकाळी साडेपाचपर्यंत एकच गर्दी झाली होती.

--------------------------------------------------------------

विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता. महिला तर आपल्या लहान मुलांना घेऊन अर्ज भरण्यास दिवसभर थांबून होत्या. वीसगाव खोरे, महुडे खोऱ्यासह पुणे-सातारा महामार्गावरील सर्वाधिक गावांचा समावेश असून, एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणूक लागल्याने व भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गावे वगळता बहुतांशी गावांतील निवडणुका लागतील असेच वातावरण सध्यातरी पाहावयास मिळत आहे.
 

Web Title: Running of candidates to file an application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.