भोर शहर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट; शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:41 PM2023-06-26T16:41:38+5:302023-06-26T16:42:55+5:30
रोडरोमिओंना चाप लावण्याची मागणी...
भोर (पुणे) :भोर शहरातील रस्त्यावर, गल्ली बोळातून जोरजोरात गाड्या उडवून फिरणारे रोडरोमिओ, शाळा, महाविद्यालयांच्या गेटवर, बसस्थानकावर गर्दी करणाऱ्यांमुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सायलेन्सरला फटाक्याचे आवाज लावून वेगात गाडी पळवल्याने अपघात होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रोडरोमिओंना चाप लावण्यासाठी भोर शहरात व ग्रामीण भागात पोलिसांमार्फत विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भोर शहरात दुचाकी गाड्या वेगाने पळवणे, वेगवेगळ्या आवाजात हॉर्न वाजवणे, शाळा, कॉलेजच्या बाहेर छेडछाड करणे आदी प्रकारात वाढ होत आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर होणारी वाढती अतिक्रमणे त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी टपऱ्यांवर मद्यपान करणारे भुरटे भाई, आठवडे बाजारात मोबाइल चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यासाठी आठवडे बाजारात पोलिसांची नेमणूक करून सदर चोरांना पकडणे गरजेचे आहे. तरच शहरातील अतिक्रमणे कमी होतील. रोडारोमिओंचा त्रास मोबाइल, मंगळसूत्र चोरी होणार नाही यासाठी भोर पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत अशी मागणी विद्यार्थांसह नागरिक करीत आहेत.
छेडाछेडीच्या प्रकारात होतेय वाढ -
दरम्यान ग्रामीण भागातून विद्यार्थिनी भोर शहरात शिक्षणासाठी एसटी बसने, तसेच मिळेल त्या वाहनाने येत आहेत. महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेत एसटी स्थानक तसेच शाळा, काॅलेज महाविद्यालय परिसरात रोडरोमिओ दुचाकी घेऊन उभे असतात. दुचाकी सुसाट चालवणे, हॉर्न मोठ्याने वाजवणे, एसटी बस स्थानकात दुचाकी घेऊन फिरणे असे उद्योग सध्या रोडरोमिओ यांनी सुरू केले आहेत. यातून छेडाछेडीचे प्रकारही वाढत आहेत. रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी महाविद्यालय सुरू होताना व सुटताना या दोन वेळी पोलिसांचे विशेष पथक तयार करून विनाकारण फिरणाऱ्या रोडरोमिओंना चांगलाच धडा शिकवण्यासाठी वेळप्रसंगी चोप देणे गरजेचे आहे.
गुन्हेगारीतही होतेय वाढ -
भोर शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गुन्ह्याच्या तपासाला वेळ लागत आहे. मुले, मुली पळून जाण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर व अवैधधंद्यात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र याकडे भोर पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.