चाकणकर बाजूलाच; चुटकी वाजवून चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 04:36 PM2024-03-18T16:36:06+5:302024-03-18T18:50:48+5:30

तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता

Rupali Chakankar aside; Chandrakant Patal criticizes Sharad Pawar with a pinch on baramati loksabha election | चाकणकर बाजूलाच; चुटकी वाजवून चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

चाकणकर बाजूलाच; चुटकी वाजवून चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

मुंबई/पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाकडून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना देण्यात आलं आहे. तर, शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि स्वत: अजित पवार हेही शरद पवार हेच आमचं श्रद्धास्थान असल्याचं सांगतात. त्यामुळे, शरद पवार यांच्यावर थेट टीका ते टाळत आहेत. मात्र, महायुतीत सोबत असलेल्या भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोबत असतानाही थेट शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. आता, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या शेजारीच बसल्या असता चंद्रकात पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. 

''तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली. यावेळी, बाजुलाच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर बसल्या होत्या. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी चुटकी वाजवून शरद पवारांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार आहे,'' असे म्हटले. 

राजकारणात तराजू लावायचा असतो, काय वजनदार आहे, काय हलकं आहे, असं म्हणत, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त वजनदार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी चुटकी वाजवून हातवारेही केले. २०१९ चं सरकार कुणामुळे गेलं?, आज तुम्ही घरात फूट वगैरे म्हणता, पण २०१९ मध्ये लोकांनी मतदान करुन १६१ जागा दिल्या होत्या. तरीही तेव्हा शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. मग, ती फूट नव्हती का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, पवारांचा हिशेब चुकता करण्याची संधी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मिळाली, असेही पाटील यांनी म्हटले. यावेळी, रुपाली चाकणकर त्यांच्या शेजारीच बसलेल्या होत्या. 

असं मांडलं बारामती लोकसभेचं गणित

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर नसताना भाजप उमेदवाराला ५ लाख ३१ हजार मते मिळाली होती. यंदा अजित पवार आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय गणितानुसार किमान दोन लाख मतांची भर त्यात पडेल. शिवाय गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार आणि पावणे दोन वर्षात महायुती सरकारने केलेल्या कामाची पुंजी आमच्याबरोबर आहे. त्यामुळे यंदा महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी होइल. मागील मतदान आणि यंदाची अजित पवारांची साथ यामुळे आमचे विजयाचे गणित सोपे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 
 

Web Title: Rupali Chakankar aside; Chandrakant Patal criticizes Sharad Pawar with a pinch on baramati loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.