Rupali Chakankar: विकृत मनोवृत्ती अन् महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न, चाकणकरांचा राणांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:10 PM2022-05-09T18:10:33+5:302022-05-09T18:12:31+5:30
नवनीत राणा केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत, तर त्यांना माझा एक प्रश्न आहे, जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्यासाठी मदत का मागितली नाही.
पुणे - मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यावरुन वादात अडकलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर शिवसेनेनं पुन्हा एकदा त्यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी लिलावती रुग्णालयातील त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोवरुन त्यांच्यावर टिका केली. तसेच, लिलावती रुग्णालय प्रशासनालाही जाब विचारला होता. आता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही नवनीत राणा यांच्यावर टिका केली आहे.
नवनीत राणा केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत, तर त्यांना माझा एक प्रश्न आहे, जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्यासाठी मदत का मागितली नाही. जर राज्यासाठी मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली असती. हे जे काही चाललंय ते शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न आणि विकृत मनोवृत्ती आहे, असे चाकणकर यांनी म्हटलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
राज्यात कसा वाद निर्माण होईल याकडे काहींचं लक्ष आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा या राज्यातील ठाकरे सरकार विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहेत. यासंदर्भात बोलताना चाकणकर म्हणाल्या की, कोरोनाच्या महामारीतून आत्ताच महाराष्ट्र बाहेर आला आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कष्टकऱ्यांचे असे खूप मोठे प्रश्न राज्यासमोर आहेत.
गणेश नाईकांच्या खटल्याप्रकरणी
गणेश नाईकांविरोधात पीडितेने राज्य महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, प्रत्यक्ष भेटून त्यांनी सगळा प्रकारदेखील सांगितला होता. याबाबत राज्य महिला आयोगाने नवी मुंबई आणि नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये कारवाई बाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सत्र न्यायालयात जामीन मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जामीन मिळाला आणि त्यानंतर देखील पीडितेने महिला आयोगाची भेट घेतली. आत्ता, पोलीस जो काही तपास करत आहेत, त्यावर महिला आयोगाचा लक्ष लागून आहे. निश्चितच तो तपास निःपक्षपाती होणार आहे.