रुपाली चाकणकरांची EVM पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:48 AM2024-06-13T09:48:33+5:302024-06-13T09:49:00+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. आता या मतदान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Collector) यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
दरम्यान, चाकणकर यांनी मतदानाच्या दिवशी (दि. ७ मे) वडगाव धायरी परिसरातील नारायणराव सणस मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली हाेती. मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे, हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने त्याच मतदान केंद्राच्या मतदान अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दिली होती. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या सूचनेनुसार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर द्विवेदी यांनी या मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असा अहवाल डाॅ. दिवसे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर दिवसे यांनी केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात, येईल असे सांगण्यात येत आहे.