महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम - रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 02:57 PM2022-07-19T14:57:32+5:302022-07-19T14:59:17+5:30
पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी...
पुणे : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे शहर भागासाठीच्या सुनावणीस प्रारंभ करण्यापूर्वी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होत्या.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम राज्य महिला आयोगाकडून होणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने बालविवाह रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, या कामाबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून श्रीमती चाकणकर म्हणाल्या, मागील तीन महिन्यात चंद्रपूर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, गडचिरोली येथेही आयोगाच्या वतीने सुनावणी घेण्यात आली. सुनावणीतून महिलांना जलद न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. सक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात की नाही, याचाही या सुनावणीवेळी मागोवा घेतला जाणार आहे.
पुणे ग्रामीण मधील तक्रारींवर २० जुलै रोजी येथे सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी घेण्यात येणार आहे. २१ जुलै रोजी ज्ञानज्योती सावित्री बाई फुले स्मारक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ पिंपरी-चिंचवड भागातील तक्रारींची जनसुनावणी सकाळी ११ वाजता होणार आहे. जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहनही चाकणकर यांनी केले.