रुपाली चाकणकरांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:59 AM2022-06-01T11:59:33+5:302022-06-01T12:14:27+5:30
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी फोन करून दिली होती धमकी...
धायरी (पुणे) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. भाऊसाहेब नारायण शिंदे ( रा. भेंडा, तालुका नेवासे, जिल्हा : अहमदनगर) असे त्या आरोपीचे नाव आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे (रा. हडपसर, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवर सोमवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता. यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील ७२ तासात जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी ज्या नंबर वरून फोन आला होता. त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो नंबर अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब नारायण शिंदे यांचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलीसांनी त्याला मंगळवारी उशिरा ताब्यात घेतले असून आज बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
लोकसेवक म्हणून शासनाने दिलेल्या कर्तव्यात प्रतिबंध....
रुपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. असे असताना जाणून - बुजून राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईनवर फोन करून त्यांच्या नावे अश्लील शब्द वापरून जिवे मारण्याची धमकी दिली. लोकसेवक म्हणून काम करीत असताना शासनाने दिलेल्या कर्तव्यात प्रतिबंध येण्याच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी दिल्याने भाऊसाहेब शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन पहिल्यांदाच आलेला नाही. तर याअगोदरही दोन वेळा त्यांना धमकीचे फोन गेले होते.
महिला आयोगाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांना राज्य महिला आयोगाचा दणका दाखवला होता. मंगळवारी (३१ मे) रोजी रुपाली चाकणकर यांचा वाढदिवस होता. तर सोमवारी म्हणजे वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच असा धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ माजली होती. मात्र धमकी देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन सिंहगड रस्ता पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा तांदळे करीत आहेत.