मुक्ता टिळकांच्या निधनाने रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार : रुपाली ठोंबरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 07:14 PM2022-12-26T19:14:09+5:302022-12-26T19:14:21+5:30
कसब्यात मुक्ता टिळकांच्या आजारपणामुळे कामे झाली नाहीत, येथील खासदारही आजारी आहेत, आता काम करणारी व्यक्ती निवडून आली पाहिजे.....
पुणे/किरण शिंदे : भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरच पोटनिवडणूक लागेल. त्या ठिकाणी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या गोटातून केली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
रूपाली ठोंबरे म्हणाल्या, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुक्ता टिळक आजारी असल्यानेच मनसेकडून माझ तिकीट कापण्यात आले होते. विधानसभा निवडणूक झाल्यापासून मुक्ता टिळक आजारी होत्या. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात फारशी कामे झाली नाही. या भागातील खासदारही आजारी आहेत. त्यामुळे आता परिसरात काम करणारी व्यक्ती निवडून आली तर पाच लाख लोकसंख्या असणाऱ्या या मतदारसंघातील लोकांची कामे मार्गी लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदेश दिला तर मी या ठिकाणी होणारी पोटनिवडणूक नक्की लढवेन.
दरम्यान मुक्ता टिळक यांच्या घरातच कुणाला तिकीट द्यायचे असेल तर त्यांच्या घरातील कुणीही राजकारणात फारसा सक्रिय दिसत नाही. त्यांचा मुलगा देखील लहान आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच व्यक्तीच्या घरात तिकीट दिले पाहिजे असाही काही नियम नाही. त्यामुळे पक्षाने आदेश दिला तर कसबा विधानसभा नक्की लढवणारच असे स्पष्ट मत रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केले.