"बेताल, सत्तापिपासू चंपा...", सुप्रिया सूळेंवरील त्या टिकेनंतर रुपाली ठोंबरेंचा प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:51 AM2022-05-26T08:51:24+5:302022-05-26T09:10:17+5:30
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील...?
पुणे : सध्या राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. काल भाजपने काढलेल्या मोर्च्यात बोलताना भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी खासदार सुप्रिया सुळेंवर तीव्र शब्दां टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाल्या, 'स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्या शिवाय शांत होत नसते . बेताल ,सत्तापिपासू चंपा'. पाटील यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
राज्यातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळावे, या मागणीला घेऊन भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. मोर्चादरम्यान पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र शब्दात टिका केली. 'मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला होता, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले, हे आम्हाला सांगितले नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे एका पत्रकारांने चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावर चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत, "कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी आणि स्वयंपाक करा, असे म्हटले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील? -
सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, 'कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असे पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी मोर्चात खासदार प्रितम मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर आणि गिरीश महाज आदी नेते उपस्थित होते. भाजपाच्या मुख्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी सुरू होताच आडवला आणि आंदोलकांना ताब्यात घेत, आंदोलन संपल्याचेही जाहीर केले.