रुपी खातेदारांचा रिझर्व्ह बँकेवर ‘संताप’; ८ फेब्रुवारीला आरबीआयवर काढणार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 04:29 PM2018-02-03T16:29:01+5:302018-02-03T16:30:41+5:30
रुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे : रुपी बँकेवर निर्बंध येऊन पाच वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही खातेदारांना दिलासा देणारा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. रुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
केंद्रीय पातळीवरील नेत्यांना रुपी बँक प्रशासन आणि खातेदारांच्या वतीने वेळोवेळी परिस्थिती समजावून सांगण्यात आली आहे. मात्र, त्यावर कोणताच सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे विलिणीकरणाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील तीन मोठ्या सहकारी बँकांनी रुपीचे विलिनीकरण करुन घेण्याची तयारी दर्शविली आहे. तशी आरबीआयला दोनदा पत्र दिलेली आहेत. परंतू त्यानंतरही आरबीआयच्या चुकीच्या भूमिकेमुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे.
त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील कार्यालयावर खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, या मोर्चानंतर रुपीच्या तोट्यात २५ कोटी रुपयांची भर घालणाऱ्या सहकार मंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पुणेकर नागरीक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी सांगितले.