‘रुपी’च्या खातेदारांना मिळणार २० हजार
By admin | Published: March 10, 2016 12:49 AM2016-03-10T00:49:35+5:302016-03-10T00:49:35+5:30
येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे
सासवड : येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर, एका महिलेने पैसे देत नाहीत म्हणून कंटाळून विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने बँकेच्या व्यवस्थापनाची पळापळ झाली होती, तर याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्धा झाल्यानंतर खळबळ उडाली होती .
त्यानंतर पैसे देण्याचे खात्रीशीर जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्णय घेऊन दि. ८ मार्च रोजी पुन्हा बँकेत ठिय्या मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज (दि. ८) पुन्हा तालुक्यातील खातेदार व ठेवीदार यांनी बँकेच्या व्यवस्थापनाकडे मागणे मांडले. तसेच, पैसे देण्याचे जाहीर केल्याशिवाय इथून हटणार नाही, असा निर्धार केला.
मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्यासह रुपी बचाव पुणेकर नागरिक कृती समितीचे मिहिर थत्ते, दिलीप सातरीकर, सुधीर गोरीवले, तुकाराम कदम, पुरंदर कृती समितीचे अध्यक्ष संभाजी जगताप, खातेदारांनी बँकेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच, विविध प्रश्नांचा भडीमार केला. आम्ही बँकेत ठेवलेले पैसे आमच्या हक्काचे आहेत, आम्ही तुमच्याकडे कर्ज मागायला नाही आलो. तुम्ही कर्जदारांकडून वसुली करा, नाही तर नका करू, आम्हाला काही देणे-घेणे नाही, मात्र आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. असा पवित्रा घेत आज पुन्हा खातेदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
मागील मिटिंग झाल्यानंतर बँकेने कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू केली आहे. केवळ आठ दिवसांत ७ लाख रुपये वसूल केल्याचे सांगितले. तसेच, मार्चअखेरपर्यंत आणखी ४० लाख रुपये वसूल करण्यात येतील. कर्जदारांचे न्यायालयात खटले सुरू असून, ते जलद निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. २०१३ मध्ये ९ कोटी रुपयांचे कर्ज होते, आता ते १ कोटी रुपयावर आले आहे. त्यामुळे ते लवकर वसूल करण्यात येतील.
- व्ही. व्ही. बहुलेकर,
शाखा अधिकारी, सासवड
> अर्ज भरून घेणार : अभ्यंकर
मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी बँकेचे प्रशासक अभ्यंकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता, त्यांनी एक एप्रिलपासून प्रत्येक खातेदाराला २० हजार रुपये देण्यात येतील, असे सांगितले. पुढील काळात ५० हजार रुपये मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरूअसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे याबाबत असे अर्ज उपलब्ध करण्यात आले असून, ठेवीदारांनी आपले अर्ज भरून द्यावेत आलेल्या एकूण अर्जांपैकी एका वेळेस १०० अर्ज भरून पाठविले जातील, तसेच त्यानंतर पुढील १०० अर्ज पाठविले जातील याप्रमाणे ठेवीदारांना पैशांचे वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.