ग्रामीण भागात ८३ पैकी ७० एमबीबीएस डॉक्टर रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:04+5:302021-06-23T04:09:04+5:30
पुणे : कोरोनाकाळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ...
पुणे : कोरोनाकाळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ८३ एमबीबीएस डॉक्टरांना नियुक्तीपत्रे दिली गेली. त्यातील ७० डॉक्टर नियुक्ती केलेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत.
दर वर्षी एमबीबीएस डॉक्टरांची ११ महिन्यांसाठी विशिष्ट समितीतर्फे नियुक्ती केली जाते. जिल्हा शल्यचिकित्सक या समितीचे सचिव असतात. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा कोरोनाचा नेटाने सामना करत आहे. विशेषतः, ग्रामीण भागात डॉक्टरांची जास्त प्रकर्षाने गरज भासत आहे. त्यामुळे एनएसएममार्फत जिल्हा परिषदेतर्फे कोविड मनुष्यबळाअंतर्गत ग्रामीण भागात एमडी (१०), एमबीबीएस (७०), बीएएमएस (६६), बीडीएस (५६), नर्स (१९९), एएनएम (६६५), डेटा एन्ट्री ऑपरेटर (१७५), क्ष किरण तंत्रज्ञ (२१), ईसीजी तंत्रज्ञ (८), हॉस्पिटल मॅनेजर (२), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (७३), औषधनिर्माता (१४), वॉर्डबॉय (२६४) अशा विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात एकूण १६२३ पदे भरण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून सुमारे ३००० एमबीबीएस डॉक्टर उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहेत. कोरोना काळात या सर्वांनाच एक वर्षाचा बॉण्ड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन बहुतांश डॉक्टर रुजू झाले आहेत. डॉक्टरांनी दुर्गम भागात एक वर्ष काम केल्यास एमडी किंवा एमएस करताना प्रोत्साहनपर ग्रेस मार्क दिले जातात. ससूनमधील २०० एमबीबीएस डॉक्टरांपैकी जवळपास १५० डॉक्टर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये अशा ठिकाणी रुजू झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही नियुक्ती केली जाते, असे एका डॉक्टरकडून सांगण्यात आले. कोरोना काळात जिल्हा परिषदेकडून कोविड मनुष्यबळाअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
------------
नियुक्ती रुजू
आंबेगाव ३ १
बारामती ६ ३
भोर ९ ९
दौंड ५ ४
हवेली ४ ४
इंदापूर ६ ३
जुन्नर ६ ५
खेड ७ ६
मावळ ७ ६
मुळशी ४ ४
पुरंदर १ २
शिरूर ७ ६
वेल्हा ७ ७
विप्रो १० १०
औंध, पुणे १ ०
---------------------------------------
८३ ७०