ग्रामीण भागात काकड आरत्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:23 PM2018-11-15T22:23:03+5:302018-11-15T22:23:35+5:30
ठिकठिकाणी भाविकांचा उत्साह : सुरेल भजन व कीर्तनाने होतेय पहाटेची सुरुवात
तळेगाव ढमढेरे : कासारी-गणेशनगर येथे पहाटेच्या गुलाबी थंडीत काकडा आरतीमध्ये भाविक मंत्रमुग्ध झाल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. तळेगाव-न्हावरा रस्त्यालगत असणाऱ्या गणेश मंदिरात गेल्या सात वषार्पासून अखंड हरीनाम सप्ताह चालू आहे. भाविकांची पहाटेपासून काकड आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तळेगाव ढमढेरे, टाकळी भिमा, कासारी, निमगाव म्हाळुंगी या चार गावांच्या सीमेवर असल्याने पंचक्रोशीतील भाविकांची दररोज पहाटेच्या वेळी या काकडा आरतीसाठी मोठी गर्दी होत असते. यावेळी नामयज्ञ सोहळा काकड आरतीचे आयोजन करण्यात येते.
रूप पाहता लोचनी! सुख झाले ओ साजणी! तोहा विठ्ठल बरवा! बहुता सुकृताची जोडी! म्हणोनी विठ्ठली आवडी ! सर्व सुखाचे आगर ! बाप रखुमा देवीवर! अशा शब्दात पहाटेच्या भक्तिमय वातावरणात येथील भाविक मंत्रमुग्ध होऊन न्हाऊन जातात. प्रथम काकड आरती, गौळणी, आरती घेतल्यानंतर प्रसाद दिला जातो. पंचक्रोशीतून भाविक अन्नदान करून या कार्यक्रमास मोठे योगदान देतात. सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात भजन, गायन सुख चैतन्याचा मळा बहरतो. गणपतीचा माळ भक्तीचा महासागर म्हणून ओळखला जातो याठिकाणी आलेला प्रत्येक माणूस प्रसन्न होत आहे. या परिसरात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून संत परंपरेची विचारधारा समजात रुजली आहे. काकड म्हणजे कुडकुडती थंडी पावसाळा संपत आल्याचे व हिवाळा चाहूल लागून कोजागिरी पौर्णिमेनंतर पहिल्या एकादशीला काकड आरती सुरु होते.
राजगुरुनगरला काकड आरत्यांची लगबग
राजगुरुनगर : काय महिमा वर्णू, आता सांगणे किती, आता सांगणे किती’ कोटी ब्रम्हहत्या, मुख पाहता जाति ॥
अशा श्रवणीय सुरांनी राजगुरुनगरमध्ये सकाळ उजाडते आहे. शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या काकडआरतीमुळे पहाटेपासूनच गावातील वातावरण मंगलमय होत आहे. श्रवणीय सुरांनी सुरू असलेल्या विविध मंदिरातील काकड आरत्यांमुळे एक वेगळीच प्रसन्नता गावात अनुभवयास मिळत आहे.
येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या ज्ञानमंदिरात पहाटे पाच वाजल्यापासूनच काकड आरतीला सुरुवात होते. गुरुवारी (दि. १५) राजगुरुनगरचे माजी सरपंच व पारायण मंडळातील ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप कासवा यांच्या हस्ते काकडआरती सोहळा झाला. यावेळी परिसरातील आबालवृद्धांसह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे सर्व संचालक, भाविक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या ज्ञानमंदिरासह बाजारपेठ येथील प्रेमळ विठ्ठल मंदिर, सुवर्णकार विठ्ठल मंदिर, संत सेनामहाराज विठ्ठल मंदिर, संत गोरोबाकाका विठ्ठल मंदिर, संत सावतामाळी विठ्ठल मंदिर आदी मंदिरांमध्ये पहाटेपासूनच श्रवणीय काकडआरत्यांनी सकाळची सुरुवात होत आहे. सध्या थंडीचे प्रमाण या भागात वाढूनही भाविक गर्दी करत आहे.
तुकाई मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा
भूगाव : भूगाव येथील शेडगे दºयातील तुकाई मंदीरात भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला होता. १००१ दिव्यांनी मंदीराचा परिसर उजळून निघाला होता. दिपोत्सवाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अभिजित शेडगे व तुकाई प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले होते. यावेळी दत्तात्रय शेडगे, अभिजित शेडगे, अनिल शेडगे, प्रदिप शेडगे, गणेश सुर्वे, नितीन सुर्वे, वामन सुर्वे, गिरीष सुर्वे, प्रशांत शेडगे, हिराबाई शेडगे, सुलाबाई शेडगे, वत्सलाबाई शेडगे, अश्विनी शेडगे, योगेश्री शेडगे, मनिषा शेडगे, माधुरी शेडगे, निमिषा शेडगे, दिपाली देशमुख, पुजा खानेकर आदी मान्यवर उपस्थित होते.