ग्रामीण भागात आता पुन्हा पेटू लागल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:15+5:302021-05-23T04:09:15+5:30

गृहिणींचे आर्थिक 'बजेट' कोलमडले नीरा : दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी ...

In rural areas, stoves are now on fire again | ग्रामीण भागात आता पुन्हा पेटू लागल्या चुली

ग्रामीण भागात आता पुन्हा पेटू लागल्या चुली

Next

गृहिणींचे आर्थिक 'बजेट' कोलमडले

नीरा : दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले; मात्र गत काही महिन्यांत गॅसचे भाव गगनाला भिडल्याने, तसेच सबसिडीही बंद झाल्याने, उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असून धुरामुळे त्यांच्या डोळ्यांत पुन्हा आसू आले आहेत.

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आता सिलिंडर महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने, आर्थिक संकट गडद होत असून, परिणामी घरोघरी वापर असलेला गॅस भरून आणण्यासाठी पैसे नसल्याने, ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी वर्ग पुन्हा चुलीकडे वळाला आहे.

ग्रामीण भागातील ९० टक्‍के कुटुंबे लाकडी सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत होते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्‍वसनाचे आजार होतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही. अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता ९० टक्‍के कुटुंबांकडे गॅस आहेत ; मात्र स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक 'बजेट' कोलमडले आहे. यातच पगारदार, व्यावसायिकही आता चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

२०२० मध्ये ५९९.५५ तर आता ८२७ रुपयांवर

उज्ज्वला योजनेंतर्गंत गॅसजोड मोफत मिळाले. काही महिने सबसिडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसिडी मिळत नसल्याने खुल्या बाजारातील दराप्रमाणे सिलिंडर घेणे परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी जानेवारी२०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहोचले, त्यानंतर महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरचे दर ७८९.५०, तर मार्च २०२१ मध्येही गॅस सिलिंडरची भाववाढ होऊन सिलिंडर ८२७ रुपयांवर पोहोचला आहे.

९७० ग्राहकांनी फिरवली पाठ

केंद्र सरकारच्या 'उज्ज्वला योजनेंतर्गत' मागील दोन-तीन वर्षामध्ये पुरंदर मधील यशोधन गॅस एजन्सीच्या माध्यमातून आत्तापर्यंत २,५३९ लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शन मोफत देण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत २,५३९ गॅस जोड लाभार्थी असले तरी, यामधील ९७० उज्ज्वल योजनेंतर्गत असलेले लाभार्थी सिलिंडर महाग आणि इतर काही कारणाने सिलिंडर भरून नेत नाहीत. दिवसेंदिवस गॅस सिलिंडरची महागाई वाढत चालल्याने गॅस विक्रीवरही यांचा परिणाम मागील काही महिन्यांपासून होत आहे. अशी माहिती यशोधन गॅस एजन्सीच्या व्यवस्थापक अश्‍विनी वाघोले यांनी सांगितले.

कोट (१)

"उज्ज्वला योजनेंतर्गंत आम्हाला यशोधन गॅस एजन्सीमधून, मागील दोन वर्षांपूर्वी गॅसजोड मोफत मिळाले. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस मिळाल्याने आनंद झाला होता; मात्र महागडा सिलिंडर घेऊन वापरणे आता परवडत नाही.

आम्ही दिवसभर उन्हा-ताणात राबल्यावर १५० रुपये मजुरी मिळते आणि त्या सिलिंडरच्या मड्यावर कुठून ८०० रुपये खर्च करायचा. आम्ही मग खायचं काय? त्यामुळे बिनखर्चिक आपली चुलच बरी."

- छाया जगताप, कष्टकरी गृहिणी

"कोरोना आल्यापासून, सगळ्याच वस्तू महागल्यात. कोरोना यायच्या आधी तेलाचे पाकीट ७५ रुपयाला मिळायचे, आता १४४ रुपायाला झालं. गॅस सिलिंडर मिळत होता ५०० रुपयाला आता ८०० च्यावर गेला. पंतप्रधान मोदींनी फुकट गॅस कनेक्शन दिलं; पण आता सिलिंडर महाग करून ठेवलाय, घरं खर्च भागविताना नाकीनऊ येतंय, त्यामुळे आम्ही आता सिलिंडर भरून आणला नाय. आता चुलीवर स्वयंपाक करतेय."

- अलका चव्हाण,

चुलीवर स्वयंपाक करताना महिला.

Web Title: In rural areas, stoves are now on fire again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.