ग्रामीण भागाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:09+5:302021-08-17T04:18:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागासोबतच आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंधदेखील दि. १६ पासून पासून शिथिल करण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी भागासोबतच आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंधदेखील दि. १६ पासून पासून शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायती नगरपालिका नगरपरिषद आणि हद्दीतील सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले आदेश आणि नियमावली, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ग्रामीण क्षेत्रांमध्ये निर्बंध शिथिल केल्याची माहिती दिली. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या काही आठवड्यापासून ५ टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आली नव्हती. मात्र, सध्या ग्रामीणचा कोरोनाबाधित दर ४.९ टक्यांवर आल्याने निर्बंधातून सूट मिळाली आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर ग्रामीण भागाला हा दिलासा मिळाला आहे. राजा त्याला नगरपालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात असणाऱ्या मॉलसाठी दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच राज्य शासनाने लागू केलेले कोरोनाविषयक सर्व नियम लागू राहणार आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व हॉटेल, बार ५० टक्के क्षमतेसह सर्व रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेलमध्ये रात्री ९ पर्यंत ऑर्डर घेता येणार आहे. हे करत असताना कोरोना विषय नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी दुकानदार आणि हॉटेल मालकांवर देण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली. जवळपास जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोनाबाधित पोचले होते. १३ तालुक्यांतील सर्वच गावांत कोरोना पसरला होता. फक्त ३४ गावे कोरोनामुक्त राहिली होती. वाढत्या रूग्णसंख्येमुळे ग्रामीणचा बाधित दर हा १४ टक्क्यांवर पोचला होता. त्यात हॉटस्पॉट गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. हा बाधित दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या खाली येत नव्हती. त्या तुलनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील बाधित दर झपाट्याने कमी झाल्याने त्यांना कोरोना निर्बंधातून सूट मिळाली. मात्र, ग्रामीण भागात निर्बंध कायम होते. हा बाधित दर जुलै महिन्यात ७ टक्क्यांवर आला. मात्र, तो ५ टक्क्यांखाली येत नसल्याने निर्बंधातून ग्रामीण भागाला सूट मिळत नव्हती. यामुळे जिल्हा परिषदेने हॉटस्पॉट गावात तसेच बाधित गावांत धडक सर्वेक्षण मोहीम राबविली. याद्वारे कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आणि प्रत्येक घरात जाऊन घराबाहेर पडणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामुळे बाधितांचे सापडण्याचे प्रमाण वाढले होते. असे असले तरी रुग्णसंख्या काही केल्या कमी येत नव्हती. सध्या जिल्ह्यातील एकूण गावांपैकी सुमारे ४०० गावांत कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जिल्हा परिषदेने दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांत बाधित कुटुंबांतील सर्व सदस्यांची आणि ज्या गावात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत, त्या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.
चौकट
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या अनेक आठवड्यापासून ५.५ च्या खाली येत नसल्याने कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आली नव्हती. मात्र, शुक्रवारी ग्रामीणचा कोरोना बाधितदर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ४.९ टक्क्यांवर आला आहे. हे चित्र दिलासादायक असून आता निर्बंधातून कधी सूट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निर्बंधातून सूट मिळाल्याने ग्रामीण भागालाही पुणे, पिंपरी चिंचवडपाठोपाठ अनेक दिवसांनंतर दिलासा मिळाला आहे.