युट्युब आणि ओटीटीच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना मिळाली नवी दिशा; डॉ अमोल कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 12:56 PM2021-07-05T12:56:10+5:302021-07-05T14:03:34+5:30
वेबसिरीज समाजाला प्रबोधन आणि मनोरंजनातून दिशा देण्याचे काम करते : खासदार डॉ. अमोल कोल्हे
सांगवी: कोविडमुळे काळ बदलत चालला असल्याने कला क्षेत्राला सध्या वाईट दिवस आहेत. सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर युट्युब आणि ओटीटीच्या माध्यमातून ग्रामीण कलाकार सुपरस्टार म्हणून उदयास येत आहे. असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर मधील तरुणांनी एकत्र येऊन युट्युबवर एक वेबसिरीज सुरु केली आहे. आणि यामधून कॉमेडीसह समाजप्रबोधन पर भाग बनवून अल्पावधीतच महाराष्ट्रासह देशभरातील लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. याच कलाकारांनी एकत्रित येऊन एक लघुपट तयार केला आहे. त्याचा शुभारंभ पुणे येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे हस्ते नुकताच पार पडला. त्यांनी वेबसिरीजचे ७५ एपिसोडमध्ये १० लाखाहून अधिक रसिक सभासद पूर्ण झाल्याबद्दल व २० कोटीहून अधिक रसिकांनी वेबसिरीज पाहिल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी केक कापून उपस्थित कलाकारांचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील वेबसिरीज समाजाला आणि तरुणांना प्रबोधन आणि मनोरंजनातून दिशा देण्याचे काम करत आहे. ग्रामीण भागातील कलाकारांकडे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता असून त्यांना समाजाने पाठबळ देण्याचे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.