ग्रामीण भागाचा बाधित दर १० टक्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:06+5:302021-06-27T04:09:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णबाधितांचा दर हा जास्त आहे. मात्र, असे ...

Rural disruption rate decreased by 10% | ग्रामीण भागाचा बाधित दर १० टक्यांनी घटला

ग्रामीण भागाचा बाधित दर १० टक्यांनी घटला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णबाधितांचा दर हा जास्त आहे. मात्र, असे असले तरी महिन्याभरात हा दर १० टक्यांनी कमी झाला आहे. सध्या ७.६ टक्के बाधित दर आहे. निर्बंध शिथील होण्यासाठी मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना प्रतिक्षाच पाहावी लागणार आहे. सध्या ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू आहेत.

दुसऱ्या लाटेल वाढलेल्या कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घटली आहे. शहरी भागात याचा वेग जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. ११ पर्यंतची मर्यादा शिथिल करून ती रात्री १० पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, पुन्हा शहरी भागात रूग्ण सापडू लागल्याने तसेच बाधितांचा दरही वाढल्याने शनिवारी पुन्हा नियमावलीत बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता निर्बंध मोठ्याप्रमाणात शिथिल न करण्याच्या सूचना तज्ञ देत आहेत. त्याचाच भाग म्हणून तिसऱ्या स्तरातील निर्बंध ही जिल्ह्यात कायम राहणार आहेत.

ग्रामीण भागाचा रुग्णबाधितांचा दर हा गेल्या महिन्यात १७ टक्यांच्या आसपास होता. या दरात महिन्याभरात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. १७ टक्यावरून हा दर थेट ७.६ टक्यांवर आला आहे. मात्र, निर्बंध शिथिल होण्यासाठी हा दर ५ टक्यांच्या खाली येणे आवश्यक असल्याने अजून तरी ग्रामीण भागातील नागरिकांना निर्बंध शिथिल होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्याही टप्याटप्याने कमी होत आहे. सध्या ९१ हॉटस्पॉट गावे जिल्ह्यात आहेत. लसीकरणाचा वेगही जिल्ह्यात वाढला आहे. यामुळे लवकरच बाधितांचा दर हा आटोक्यात येऊन निर्बंध उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चौकट

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या दुप्पटीचा कालावधी हा ७१ दिवसांवर आला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीतधरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्येही घट होत आहे.

चौकट

जुन्नरमध्ये सर्वाधिक क्रियाशील रुग्ण तर हवेलीत सर्वाधिक क्रियाशील कंटेन्मेंट झोन

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आजच्या घडीला ग्रामीण भागात ४ हजार ८७४ क्रियाशील रुग्ण आहेत. तर २ हजार ८९३ क्रियाशील कंन्टेंमेन्ट झोन आहेत. बाधितांचा आकडा कमी होत असला तरी सर्वाधिक क्रियाशील रुग्ण हे जुन्नर तालुक्यात आहेत. जुन्नरमध्ये ८३२ रुग्ण आहेत. हवेली तालुक्यात सर्वाधिक ९५५ क्रियाशील कंटेन्मेन्ट झोन आहेत.

चौकट

९१ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण

ग्रामीण भागात ९१ गावांत १० पेक्षा जास्त कोरोना बाधित आहेत. जुन्नर तालुक्यात १६ तर खेड तालुक्यात १३ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. तालुकानिहाय हॉटस्पाॅट गावे- बारामती ९, दौंड ६, मावळ ७, हवेली ९, खेड १३, आंबेगाव १०, जुन्नर १६, शिरूर ४, पुरंदर १०, इंदापूर २, मुळशी ३, भोर १, वेल्हा १

चौकट

सर्वात जास्त क्रियाशील रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट ग्रामपंचायती

ओतुर (जुन्नर) ७६, मांडकी (पुरंदर) ५०, खोडद (जुन्नर) ५०, नारायणगाव (जुन्नर) ४७, मांजरी बुद्रुक(हवेली) ४२, नांदेड (हवेली)४२, नानविज (दौंड) ४२, मंगळूर (जुन्नर) ३९, देहू (हवेली) ३७, नऱ्हे (हवेली) ३६.

चौकट

शनिवारी जिल्ह्याला मिळाल्या ३८ हजार ५०० लसींचे डोस

लसीचा पुरवठा सुरळीत होत असल्याने लसीकरणाला वेग आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ३८ हजार ५०० लसीचे डोस वितरित करण्यात आले. त्यामध्ये कोविशिल्डचे ३० हजार तर कोवॅक्सिनचे ८ हजार ५०० डोसचा समावेश आहे.

जिल्ह्यात ७७२ लसीकरण केंद्र कार्यान्वित असून, त्यात ५५७ केंद्र शासनाची तर २१५ केंद्र हे खासगी आहेत. प्राप्त होणाऱ्या लसीच्या प्रमाणानुसार केंद्रांना लसीचे वितरण केले जात आहे. शनिवारी (दि.२६) कोविशिल्डचे ३०हजार डोस वितरीत करण्यात आले. त्यात सर्वाधिक हवेली तालुक्याला ३ हजार डोस, इंदापूर, जुन्नर व खेड तालुक्याला प्रत्येकी २ हजार ८०० डोस, बारामती व शिरुर तालुक्याला प्रत्येकी २ हजार २०० , आंबेगाव, मावळ, पुरंदर, मुळशी व दौंड तालुक्यांसाठी प्रत्येकी दोन हजार, भोर दीड हजार, वेल्हा १ हजार २०० , पुणे, खडकी व देहु कॅटोन्मेंट बोर्डासाठी प्रत्येकी ५०० डोस वितरित करण्यात आले आहेत. औंध रुग्णालयाला कोविशिल्डचे १ हजार २०० तर सर्व तालुक्यांना प्रत्येकी १०० डोस वितरीत करण्यात आले आहेत.

Web Title: Rural disruption rate decreased by 10%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.