ग्रामीण आरोग्य रुग्णालयेच आजारी
By Admin | Published: December 22, 2015 01:07 AM2015-12-22T01:07:33+5:302015-12-22T01:07:33+5:30
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयांची मंगळवारी पाहणी करण्यात आली. त्यात काही आरोग्य केंद्रांना सुसज्ज इमारती असूनही साधनांचा व कर्मचाऱ्यांचा अभाव
मावळ : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयांची मंगळवारी पाहणी करण्यात आली. त्यात काही आरोग्य केंद्रांना सुसज्ज इमारती असूनही साधनांचा व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. तर काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य केंद्र चालवले जात असल्याची माहिती उजेडात आली. सुसज्ज इमारती असूनही कर्मचाऱ्यांच्या अनियमितपणामुळे रुग्ण शासकीय रुग्णालयांकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांचा मात्र गल्ला भरत आहे. आरोग्य केंद्रांच्या बाबतीत असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे.
तळेगाव दाभाडे : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यान्वित असलेल्या मावळ तालुक्यातील आंबी आरोग्य उपकेंद्रास स्वतंत्र जागा व पुरेसे कर्मचारी नसल्याने परिसरातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
आंबी आरोग्य उपकेंद्रांतर्गत आंबी, वराळे, नवलाख उंब्रे, बधालवाडी,परीटवाडी, जांबवडे,जाधववाडी व इतर वस्त्यांचा समावेश होतो. उत्तर मावळ ग्रामीण भागातील गरीब-गरजूंसाठी मोफत लसीकरण, माफक दरात आरोग्य सेवा पुरवली जाते. परंतु, या आरोग्य उपकेंद्रास स्वत:ची स्वतंत्र जागा नसल्याने ते बऱ्याच वर्षांपासून येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत एका कोपऱ्यात चालवले जात आहे. सुरुवातीला १४ हजार लोकसंख्या गृहीत धरून चालू केलेले हे आरोग्य उपकेंद्र सद्य:स्थितीत जवळपास दीडपट लोकसंख्येचा भार आहे. केवळ एकच आरोग्यसेविका या आरोग्य केंद्राचे काम पाहते. त्यामुळे रुग्णांना उपचार करण्यास अनेक अडचणी येत आहेत. आंबी उपकेंद्रास किमान दोन आरोग्यसेवक आणि दोन नर्सची गरज असताना फक्त एकाच नर्सला हे काम करावे लागत आहे. रोगराई व साथीच्या काळात लसीकरण,उपचार आणि सर्वेक्षणासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विविध साथींचा प्रसार ही नित्याची बाब ठरत आहे. आंबी उपकेंद्राची व्यथा कोणी समजून घ्यायला तयार नसल्याने रुग्णांचेदेखील हाल होत आहेत. आंबी उपकेंद्रास ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषदेने त्वरित स्वतंत्र जागा व खोली उपलब्ध करून द्यावी आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी आंबीकरांची बऱ्याच दिवसांपासून मागणी आहे. नवलाख उंब्रेसाठी स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र मंजूर होऊनही ते रखडले आहे. आंबी उपकेंद्राची एक आरोग्यसेविका आशा कार्यकर्त्याच्या मदतीने काम पाहत आहे. त्यामुळे गरोदर महिलांच्या तपासण्या, प्रसूती, तसेच लसीकरण आरोग्य सत्र व अन्य योजनांची अंमलबजावणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.