आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा पंगू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:09+5:302021-09-22T04:13:09+5:30
भिवेगाव येथील महिलेचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू -- अयाज तांबोळी : डेहणे सध्या कोरोना महामारीचे संकट, आदिवासी भागात उद्भवलेले साथीचे ...
भिवेगाव येथील महिलेचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू
--
अयाज तांबोळी : डेहणे
सध्या कोरोना महामारीचे संकट, आदिवासी भागात उद्भवलेले साथीचे रोग अशा काळात आरोग्य यंत्रणा तगडी असणे गरजेचे आहे, परंतु सध्याचे उलट चित्र खेडच्या पश्चिम भागात पाहावयास मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या व वैद्यकीय अधिकारी यांच्या अनास्थेमुळे डेहणे आरोग्य केंद्रात अनेक रुग्णांचा अक्षरशः बळी जात आहे. मार्च महिन्यात धामणगाव येथील अर्भकाचा डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भात मृत्यू झाला व सोमवारी (दि.२०) भिवेगाव येथील महिलेचा सर्पदंशामुळे झालेल्या मृत्युमुळे आदिवासींच्या आरोग्याच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोग्य यंत्रणा पंगू झाल्याचेच चित्र आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे असताना, वर्ग एकचे अधिकारी पद रिक्त आहे. एकच डॉक्टर २५ गावांच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी घेताना दिसत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसत आहे. डेहणे आरोग्य केंद्रातील वर्ग एकचे पद रिक्त आहे. त्यामुळे अशा आरोग्य केंद्राची जबाबदारी लगतच्या या केंद्रातील डॉक्टरांकडे सोपविण्यात येते, त्याचा परिणाम विशेषत: ग्रामीण आरोग्यसेवेवर होत आहे. उर्वरित कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालय व उपकेंद्रात असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या अशा केंद्रातील कार्यरत कर्मचारी कोविड केअर सेंटरवर नियुक्ती दिली जात असल्याने, इतर आजार व साथीच्या काळात कर्मचाऱ्यांचा होणारा तुटवडा पाहता, आरोग्य यंत्रणा पंगू झाली आहे.
डेहणे आरोग्य केंद्र तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील म्हणून ओळखले जाते. सर्पदंश, नैसर्गिक आपत्ती अशा लहान-मोठ्या घातपातापासून तर अपघातांतील रुग्णांसह आदिवासी, डोंगराळ भागातील दैनंदिन ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी तत्पर सेवा मिळणे गरजेचे आहे. अशाही स्थितीत सन २००६ पासून या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक हे प्रमुख पद रिक्त आहे. एक वैद्यकीय अधिकारी, १४ आरोग्य कर्मचाऱ्यांवर या रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.धैर्यशील पंडित या एकमेव वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली डेहणे आरोग्य केंद्राचा कारभार सध्या सुरू आहे. या ठिकाणी रुग्णांची मोठी संख्या आहे.
----------------------------
बिरसा ब्रिगेडकडून मोर्चा
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत व त्यांचा जीव जात असल्याचा आरोप करत बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांनी आज मोर्चा काढला. यावेळी त्यांनी डाॅ.धैर्यशील पंडित यांच्यावर प्रश्नांना भडिमार करत, कर्मचारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा निषेध केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, ब्रिगेडचे अध्यक्ष एकनाथ तळपे, नामदेव गवारी, संतोष मराठे, गणेश भोजणे, प्रकाश मुऱ्हे, सचिव लक्ष्मण मदगे भरत बांगर व शेकडो तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.