ग्रामीण भागाची बत्ती अजूनही गुलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:56+5:302021-07-10T04:08:56+5:30
कुरकुंभ : थकीत वीजबिलांमुळे महावितरणने ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अद्यापपर्यंत ग्रामपंचायतींनी ही थकीत रक्कम न ...
कुरकुंभ : थकीत वीजबिलांमुळे महावितरणने ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अद्यापपर्यंत ग्रामपंचायतींनी ही थकीत रक्कम न भरल्याने गावची बत्ती गुलच आहे. रात्री लाईट नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.
कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. केवळ ग्रामपंचायतीच नाही तर सर्वच क्षेत्रांवर कोरोनामुळे परिणाम झालेला दिसून येत आहे. महावितरणवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे कठोर पावले उचलत महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम राज्यात राबविली. ज्यांनी बिले भरली नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करत वीजजोडणी बंद केली. याचा सर्वाधिक फटका राज्यातील ग्रामपंचायतींना बसला. अनेक ग्रामपंचायतींनी नळपाणीपुरवठा योजनेची तसेच स्ट्रीट लाईटची वीजबिले न भरल्याने महावितरणने त्यांची वीजजोडणी बंद केली. त्यामुळे अनेक गावांची ना लाईट ना पाणी अशी अवस्था झाली होती. पुणे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना महावितरणच्या मोहिमेचा फटका बसला होता.
महावितरणविरोधात अनेक ग्रामपंचायती रस्त्यावर उतरल्या होत्या. वेळप्रसंगी महावितरणच्या मालमत्तांचा कर थकीत असल्याचे कारण सांगत थकीत वीजबिले भरणार नसल्याची भूमिकाही घेतली. मात्र, प्रशासनाने महावितरणची थकीत बिले १५ व्या वित्त आयोगातून भरण्याचे आदेश ग्रामपंचायतींना प्रशासनाने दिल्याचे असल्याचे महावितरणने सांगितले. मात्र, तरीही काही ग्रामपंचायतींनी ही बिले भरली नाहीत. कुरकुंभ ग्रामपंचायतींनेही थकीत बिल न भरल्यामुळे स्ट्रीट लाईट बंदच आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना व उशिरा कामावरून घरी येणाऱ्या कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरात चोरीच्या घटनेचा संभाव्य धोका निर्माण होत आहे. कुरकुंभमधील मुख्य चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी कुरकुंभच्या माजी सरपंच जयश्री भागवत यांनी केली आहे.
सध्या ग्रामीण भागातील रस्त्यावरील बत्ती गुल झाल्याने गावकारभाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. निवडणुकीत रस्ते, वीज, पाणी या तीन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले गेल्याने वाड्यावस्त्यांवर व निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येक रस्त्यांवर विजेचे खांब बसवण्यात आले होते. मात्र याच खांबावरील वीजप्रवाह खंडित झाल्याने व थकीत बाकी भरमसाठ असल्याने बंद झालेल्या स्ट्रीटलाईट पुन्हा सुरु करण्यात अनेक अडचणींचा सामना स्थानिक प्रशासनाला करावा लागणार आहे.