ग्रामीण पोलिसांनी बँक ग्राहकांना लुटणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 09:44 AM2019-09-28T09:44:56+5:302019-09-28T09:45:04+5:30
पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांच्या बाहेर ग्राहकांच्या पैशाची लूटमार करणाऱ्या दोघांचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.
पुणे : पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांच्या बाहेर ग्राहकांच्या पैशाची लूटमार करणाऱ्या दोघांचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही शिरुरमध्ये ही कारवाई करण्यात आली. प्रसाद शामदास कुंचला (वय ३०, रा़ बिटरगुंटा, ता़ जि़ नेल्लुर, आंध्र प्रदेश) आणि श्रीनिवास एस सुकमनियन (वय ४५, रा़ वेलईपट्टी, जि़ मदुराई, तामिळनाडु) अशी त्यांची नावे आहेत.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडुमधील अनेक टोळ्या अशा प्रकारचे गुन्हे करत असतात. या दोघांनी रांजणगाव, इंदापूर, बारामती, सासवड, शिरुर, शिक्रापूर या ठिकाणी जबरी चोरी, वाहनांच्या काचा फोडून मोटारसायकलची डिकी उचकटून रोख रकमेची चोरी केल्याचे ते सांगत आहे. त्यांनी शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी रांजणगावमधील बँकेच्या परिसरामध्ये ग्राहकाला लुबाडले आहे. पुणे जिल्ह्यात बँकेच्या ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले असल्याचे गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी एक पथक स्थापन केले. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद निम्हण, हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, जनार्धन शेळके, विजय कांचन, राजू मोमीन, बाळासाहेब खडके, धिरज जाधव या पथकाने जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांच्या ठिकाणाची माहिती घेतली.
अशा प्रकारचे गुन्हे इंदापूर, बारामती, शिरुर, शिक्रापूर, सासवड आणि रांजणगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेले होते. या परिसरामधील सी सी टीव्ही संकलीत करण्यात आले. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे गुन्हे पुणे, सातारा, नवी मुंबई, जळगाव या ठिकाणी घडले होते. त्याची माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार आरोपींचा शोध घेतला जात असताना संशयित शिरुर स्टेट बँक परिसरामध्ये चोरी करता आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने स्टेट बँकेच्या परिसरात पोहचले़. पोलिसांना पाहताच हे दोघे पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करुन पोलिसांनी पकडले.
हे दोघेही सराईत गुन्हेगार असून यापूर्वी २०१६ मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करीत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील रहिवासी असून ते टोळीने पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाड्याचे खोलीमध्ये राहतात. त्यानंतर रेकी करून चो-या करतात. मोटारीच्या काचा फोडण्यासाठी लोखंडी बॉल बेरिंग, अंगावर खाज सुटण्याची पावडर अंगावर घाण टाकणे, वाहनांच्या काचांवर ऑईल टाकणे, रस्त्यावर पैसे पडले आहेत, असे सांगून वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे करीत असतात. त्यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात ७, रांजणगाव, बदलापूर, शिक्रापूर येथे प्रत्येकी एक असे १० गुन्हे दाखल आहेत.