ग्रामस्थ सुन्न!
By Admin | Published: August 1, 2014 05:25 AM2014-08-01T05:25:30+5:302014-08-01T05:25:30+5:30
माळीणमधील बुधवारच्या दुर्घटनेची माहिती ऐकून ठिकठिकाणांहून येथील ग्रामस्थांचे नातेवाईक पोहोचत होते.
माळीण : माळीणमधील बुधवारच्या दुर्घटनेची माहिती ऐकून ठिकठिकाणांहून येथील ग्रामस्थांचे नातेवाईक पोहोचत होते. ढिगारे उपसण्याचे काम सुरू असताना बाजूला विमनस्क अवस्थेत अनेक जण बसून होते. जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असताना कोणी सापडल्याचे कळले, की लगेच धाव घेत होते. मात्र, मृतदेहाची अवस्था अशी की ओळखणेही मुश्कील.
कालच्या घटनेत अगदी काही मिनिटांच्या अंतराने वाचलेले सावळेराम लेंभे अगदी सुन्न होऊन सगळे मदतकार्य पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोरून गावातील एकेकाचा चेहरा तरळत होता. कुटुंबांची नावे सांगताना त्यांचे काय झाले असावे या कल्पनेनेही त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. लेंभे यांनी सांगितले, ‘‘गावातील झांजरे कुटुंबातील किमान २२ जण या दुर्घटनेत बळी गेले. रामचंद्र कृष्ण झांजरे आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई झांजरे हे बेपत्ता झाले आहेत. दांगडे कुटुंबातीलही चौघे जण बेपत्ता झाले आहेत. दामू कृष्णा दांगडे आणि त्यांच्या पत्नी बबुबाई यांच्यासह दोन मुले बेपत्ता आहेत. मनीषा ही दहावीत शिकणारी मुलगी आणि गणेश हा नववीतील मुलगा बेपत्ता आहे. ’’ (वार्ताहर)