पुण्यात मार्केट यार्डमध्ये भाज्या खरेदीसाठी एकच गर्दी ; पोलिसांना करावे लागले पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:12 AM2020-03-24T10:12:38+5:302020-03-24T10:18:31+5:30
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या ३१ इतकी आहे. त्यापैकी १९ रुग्ण पुणे तर १२ रुग्ण पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता.त्यामुळे पुणे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसत आहे.
पुणे :एकीकडे प्रशासन लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करून थकले असताना मंगळवारी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र एकच गर्दी बघायला मिळाली. उद्या (दि.२५पासून) ३१ मार्चपर्यंत बाजार समिती बंद असल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर ही गर्दी कमी न होता वाढताना दिसल्याने पोलिसांना बोलवावे लागले. सध्या गर्दी पांगली असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आहे.
अधिक माहिती अशी की, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या ३१ इतकी आहे. त्यापैकी १९ रुग्ण पुणे तर १२ रुग्ण पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता.त्यामुळे पुणे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसत आहे. इतकेच नव्हे राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व नागरी व्यवहार मंदावले असून केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहे. तसेच जिल्हा अंतर्गत सीमाही बंद करण्यात आल्या असून लोकांना जास्तीत जास्त घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आयोजित एकदिवसीय जनता कर्फ्यू वगळल्यास नागरिकांनी पुन्हा घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अखेर कलम १४४नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यातही काहीशी अशीच स्थिती असून आपत्कालीन सेवा वगळता पीएमपी बस सेवा, सर्व बाजारपेठा, दुकाने, सेवा बंद आहेत. इतकेच नव्हे तर तीन दिवसांनंतर उघडण्यात आलेले मार्केट यार्ड काल आणि आजनंतर पुन्हा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय आडते असोशिएशनने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी मार्केट यार्डला एकच गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले. सुरुवातीला सर्व व्यवहार हा शांततेत सुरु होता. मात्र लोकांची गर्दी वाढल्याने घटनास्थळी पोलिसांनी पाचारण करावे लागले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून टप्प्याटप्प्याने लोकांना आत सोडले जात आहे.