फक्त 75 रुपयांत तिकिटासाठी तुडुंब गर्दी; प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:08 PM2022-09-23T13:08:34+5:302022-09-23T13:09:37+5:30
तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात
पुणे : राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त १६ सप्टेंबरला देशभरातील हजारो मल्टिप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांना तिकीट मिळणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 16 सप्टेंबरला तसे होऊ शकले नाही. असोसिएशनने नंतर पुन्हा जाहीर केले की, राष्ट्रीय चित्रपट दिन आता 23 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशात ७५ रुपयात चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यातही सवलतीत चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी असून सर्व सिनेमागृह हाऊसफुल्ल झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर विविध पोस्ट येऊ लागल्या आहेत. प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? असा सवाल एका मराठी दिग्दर्शकाने उपस्थित केला आहे.
चित्रपट दिनानिमीत्त १६ सप्टेंबरला ७५ रुपयात चित्रपट पाहण्याची संधी मिळाणार होती. परंतु सिनेमागृह मालकांच्या आग्रहास्तव ती तारीख पुढे ढकलण्यात आली. आणि २३ सप्टेंबर निश्चित झाली. त्यानंतर २२ तारखेला चित्रपटाच्या बुकिंगने जोर धरला होता. बुक माय शो वर तर दुपारनंतर फिलिंग फास्ट तिकीट विक्री सुरु होती. रात्री तर ९० टक्के चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. नागरिकांना तिकीट न मिळाल्याने ते सोशल मीडियावर हाऊसफूल्लच्या पोस्ट टाकू लागले आहेत. त्यातच एका दिगदर्शकाने अशी पोस्ट केली आहे. ''आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.
कोरोना काळात शासनाने चित्रपटगृहांना ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली होती. त्यावेळी त्यांच्याकडून चित्रपटांचे तिकीट दर वाढवण्यात आले. तरीही प्रेक्षकांनी चित्रपटांकडे पाठ फिरवली नाही. मनोरंजनाची आवड असणाऱ्यांनी वाढलेल्या दराचा विचार न करता चित्रपट पाहण्यास प्राधान्य दिले. पण कोरोनाचा वेग कमी झाल्यानंतर शासनाकडून सर्व काही निर्बंधमुक्त करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी नाट्यगृह, सिनेमागृह, हॉल समारंभ, लग्न, कार्यक्रम यावरून ५० टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात आली. पण त्यानंतरही चित्रपटगृहांनी तिकीट दर कमी केले नाहीत. कोरोना काळात वाढवलेल्या तिकीटदरातच अजूनही नवीन चित्रपटांची तिकीट विक्री केली जात आहे. त्यामुळे अभिनेते, दिगदर्शक यांना चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर वारंवार त्याचे प्रमोशन, जाहिरात करावी लागत असल्याचे दिसू लागले आहे. आजच्या सवलतीच्या तिकिटांसाठीची गर्दी पाहून मल्टिप्लेक्सने दर कमी करावेत. अशी चर्चाही शहरवासियांमध्ये दिसून आली आहे.